अल्ट्राटेक फाउंडेशनद्वारे ‘माणुसकीची भिंत’चे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 00:49 IST2017-03-30T00:49:59+5:302017-03-30T00:49:59+5:30
मानवाने मानवाच्या गरजा पूर्ण करण्याकरिता मदतीचा हात समोर करून एकमेकांना सहकार्य करायचे असते. तोच खरा माणुसकीचा धर्म समजला जातो.

अल्ट्राटेक फाउंडेशनद्वारे ‘माणुसकीची भिंत’चे लोकार्पण
गडचांदूर : मानवाने मानवाच्या गरजा पूर्ण करण्याकरिता मदतीचा हात समोर करून एकमेकांना सहकार्य करायचे असते. तोच खरा माणुसकीचा धर्म समजला जातो. गरजु लोकांना वेळेवर त्यांना लागणार साहित्य प्राप्त व्हावे, याकरिता अल्ट्राटेक फाउंडेशनच्या वतीने माणुसकीची भिंत उभारण्यात आली.
या उपक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरटकर यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार विनोद रोकडे अध्यक्षस्थानी अल्ट्राटेक कंपनीचे युनिट हेड जी. बालसुब्रम्हण्यम उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून फंक्शन हेड अलोक निगम, एस.के. तिवारी, अनिल पिलई, गजेंद्र सिंग, आनंद लोहीया, जि.प. सदस्य शिवचंद्र काळे, कामगार संघाचे साईनाथ बुच्चे, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, सुनिल देसाई, राजेंद्र मेहता, रमेशकुमार देवांगन, अनिल शर्मा, सुधीर गुप्ता, नरेश कौशिक, डॉ. अनिल रायपलीवार, चंद्रशेखर पला, भावेशवाला, रत्नाकर चटप, प्रमोद वाघाडे, रवी बंडीवार व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
समाजात जीवन जगत असताना अनेक निरागस चेहऱ्यांना आपण पाहतो. ज्यांच्या जीवनातला आनंद हरपल्याचे त्यांना वाटत असते. त्या मानवांना त्यांच्या जीवनात हास्य निर्माण करण्याकरिता आम्हा सर्वांना मदतीचा हात द्यायचा आहे. याकरिता नको असेल ते आणून द्या, हवे असेल ते घेऊन जा, हा नारा देऊन माणुसकीच्या भिंतीचे उद्घाटन करण्यात आले आहे. आपल्या घरातील नको असलेली वस्तु इतरांच्या कामात येऊ शकते. अशा वस्तु या ठिकाणी पोहचवायच्या आहेत व गरजु लोकांनी त्या घेऊन जायच्या आहेत.
या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करून या उपक्रमाद्वारे माणुसकीचे नाते जपायला मदत करावी, असे प्रतिपादन अल्ट्राटेकचे युनिट हेड जी. बालसुब्रमण्यम यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरटकर, ठाणेदार विनोद रोकडे, अल्ट्राटेक कंपनीचे सर्व अधिकारी यांनी नको असलेल्या वस्तु इथे ठेवून या उपक्रमाची सुरूवात केली. (वार्ताहर)