रत्नापूर येथे आरोग्य उपकेंद्र इमारतीचे लोकार्पण
By Admin | Updated: October 29, 2016 00:49 IST2016-10-29T00:49:50+5:302016-10-29T00:49:50+5:30
ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा त्यांच्याच गावात वेळेवर उपलब्ध व्हावे,...

रत्नापूर येथे आरोग्य उपकेंद्र इमारतीचे लोकार्पण
संध्या गुरनुले यांचे प्रतिपादन : आरोग्य उपकेंद्राची इमारत सेवा केंद्र इमारत झाली पाहिजे
नवरगाव : ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा त्यांच्याच गावात वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम करण्यात येत आहे. रत्नापूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एक करोड ११ लाख रुपये खर्च करून इमारत बांधण्यात आली असून ती केवळ इमारत राहता कामा नये तर ते आरोग्य सेवा केंद्र इमारत व्हावी, असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले यांनी केले.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रत्नापूर येथे नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरुन त्या बोलत होत्या. उद्घाटक म्हणून खासदार अशोक नेते होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. अतुल देशकर, जि.प. उपाध्यक्ष कल्पना बोरकर, बाजार समितीचे सभापती राजेंद्र बोरकर, जि.प. सदस्य नागराज गेडाम, पं.स. सदस्य मुर्लीधर मडावी, सरपंच सदाशिव मेश्राम, उपसरपंच उद्धवराव तोडफोडे, अशोक कुळमेथे, निलीमा गभणे, जितेंद्र बोरकर, एस.एस. हकीमभाई, माधुरी बोरकर, ज्ञानदेव बोरकर, संजय गजपुरे, कमलाकर सिद्धमशेट्टीवार, प्रा. गोपीचंद गणविर, प्रमोद बोरकर आदी उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच आत्माराम बोरकर यांनी स्वत:ची जागा इमारत बांधकामासाठी दिल्याने पाहुण्यांनी आत्माराम बोरकर यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र बोरकर यांनी केले. संचालन शशांक बोरकर तर आभार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष सागुळले यांनी केले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)