त्रुटींसह होणार उड्डाण पुलाचे लोकार्पण
By Admin | Updated: March 17, 2016 00:53 IST2016-03-17T00:53:49+5:302016-03-17T00:53:49+5:30
सन २०१२ मध्ये बांधकाम सुरू झालेला येथील वरोरा नाका चौकातील उड्डाण पूल अखेर १ एप्रिलपासून त्रुटींसह वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

त्रुटींसह होणार उड्डाण पुलाचे लोकार्पण
कामाची कासवगती सुरूच : लाखोंचा दंड ठोठावूनही कंत्राटदार ढिम्म
चंद्रपूर : सन २०१२ मध्ये बांधकाम सुरू झालेला येथील वरोरा नाका चौकातील उड्डाण पूल अखेर १ एप्रिलपासून त्रुटींसह वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तशी अधिकृत घोषणा झाली असली तरी अद्याप उड्डाण पुलालगतच्या आयटीआयसमोरील रस्त्याचे बांधकाम पूर्ण न झाल्याने १ एप्रिलपासून हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
विशेष म्हणजे नवा उड्डाण पूल जुन्या पुलाला जोडताना मोठी त्रुटी निर्माण झाली असून त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मूल मार्गाने जुन्या पुलावरून नव्या पुलावर चढताना त्या ठिकाणी मोठा खोलगट भाग तयार झाला आहे. त्यामुळे वाहनांना या खोलगट भागातून वळताना अपघात घडण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी व्यवस्थित ‘लेव्हलिंग’ करण्यात कंत्राटदाराने दिरंगाई केल्याचे दिसून येते.
जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी नुकतीच या उड्डाण पुलाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक गाडेगोने, कोडगिरवार, वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक कोळी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी उड्डाण पुलाच्या बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता गाडेगोन यांनी पुलासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. पुलाचे बांधकाम जवळपास काम पूर्ण झाले असून केवळ विजेचे खांब उभारण्याचे काम बाकी आहे. ते तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहे.
आयटीआयसमोरील रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती गाडेगोने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येत्या १ एप्रिलपासून हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
सन २०१२ मध्ये या उड्डाण पुलाचे काम सुरू झाले. १६.३ कोटी रुपये खर्चाचा हा उड्डाण पूल सन २०१४ च्या अखेरीस पूर्ण करण्याचा करार कंत्राटदाराशी झाला होता. या कामाचे कंत्राट ठाणे येथील मे.अजय पाल मंगल अॅन्ड कंपनीला देण्यात आले होते. मात्र या कंपनीने सन २०१६ हे वर्ष उजाडले तरी उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास नेले नाही. परिणामी १६.३ कोटींचा खर्च २० कोटीच्या घरात गेला आहे. कंत्राटदार कंपनीची कामाबाबतची कासवगती लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने १ आॅक्टोबर २०१२ ते ३१ मार्च २०१४ या काळात दरदिवशी पाच हजार रुपये दंड ठोठावला. (स्थानिक प्रतिनिधी)
एका विंगचे काम अद्याप बाकीच
उड्डाण पुलावरून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या विंगचे काम अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे उड्डाण पूल सुरू झाल्यानंतरही मूल मार्गाने येणाऱ्या वाहनांना आंबेडकर महाविद्यालयाकडे वळता येणार नाही. येत्या आॅगस्टपर्यंत या विंगचे काम पूर्ण होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केली आहे. मात्र उड्डाण पुलाच्याच कामाला इतका विलंब लागल्याने ठरावीक वेळेत या विंगचे काम पूर्ण होईल का, असा प्रश्न आहे.