हत्तीरोग मुक्तीसाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे
By Admin | Updated: December 9, 2014 22:48 IST2014-12-09T22:48:14+5:302014-12-09T22:48:14+5:30
हत्ती रोगाच्या मुक्तीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, नागरिकांना डी.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळ्यांबद्दलचे फायदे व माहिती

हत्तीरोग मुक्तीसाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे
चंद्रपूर : हत्ती रोगाच्या मुक्तीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, नागरिकांना डी.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळ्यांबद्दलचे फायदे व माहिती पटवून द्यावी, असे मत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केले.
हत्तीरोग निर्मूलन समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. डी.टी. नन्नावरे, हत्ती रोग अधिकारी आर.डी. टोंगे, मनपाच्या नोडल अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, डॉ.जी.एम. मेश्राम व जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी उपस्थित होते.
या गोळ्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले. राष्ट्रीय हत्तीरोग दिवसानिमित्त जिल्ह्यातील १४ ते १८ डिसेंबर या कालावधी डी.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण भागात १४ ते १६ डिसेंबर या तीन दिवसात तर शहरी भागात १४ ते १८ डिसेंबर या पाच दिवसात या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आंगणवाडी कार्यकर्ती, आशा व अनुभवी स्वयंसेवक हे राहणार असून त्यांना या मोहिमेपूर्वी प्रशिक्षण देण्यात येईल. या कर्मचाऱ्यांवर आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक, तालुका पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, शालेय आरोग्य वैद्यकीय अधिकारी, आयुष डॉक्टर व आशा समन्वयक हे पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या गोळ्यांचे हत्तीरोग संवेदनशील क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा या गोळ्यांचे सेवन करावे. तसेच दोन वर्षाखालील बालके, गर्भवती माता व अतिगंभीर आजारी व्यक्तींना या गोळ्या सेवन करण्यास देऊ नये असे संबंधित यंत्रणेला सुचना दिल्या आहेत. हत्तीरोगासंबंधीचे औषध विनामूल्य असून अधिक माहितीकरिता जवळील आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)