सावरगाव : लॉकडाऊन शिथिल करुन लहान मोठे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी याबाबत तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अश्विन मेश्राम यांच्या नेतृत्वात सोमवारी निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यात लॉकडाऊन लागू केल्याने सर्व छोटी-मोठी दुकाने बंद पडली. रोजगारच नसल्यामुळे बेरोजगारीच्या समस्येला तरुण, युवक, गरीब, सर्वसामान्य लोक तोंड देत आहेत. मागील एक वर्षापासून कोरोनामुळे लागलेल्या लाॅकडाऊनमुळे सरकारी कर्मचारी वगळता सर्वसामान्य लोकांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. दिवसभर काम करून सकाळ-संध्याकाळचे पोट भरणाऱ्या श्रमिक कामगारांचे उपासमारीमुळे हाल होत आहेत. टपरीवाल्यापासून ते अगदी छोटे व्यवसाय करणारे लोक धंदे बंद पडल्याने मानसिकरीत्या ढासळत चालले आहेत. तर दुसरीकडे वीज वितरण कंपनीकडून पाचशे रुपयांवर वीजबिल असले तरी मार्च अखेरच्या नावाखाली वीज खंडित केली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र घरबसल्या पगार मिळत आहे. मात्र सर्वसामान्य जनता उपासमारीने मरत आहे. याबाबीचा सरकारने विचार केला पाहिजे. अशा उपासमारीच्या परिस्थितीत जगावे की मरावे? हा सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे लाॅकडाऊन शिथिल करावे, अशी मांगणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अश्विन मेश्राम, तालुकाध्यक्ष खेमदेव गेडाम, महिला अध्यक्ष कल्पना खरात, महासचिव शैलेंद्र बारसागडे, सचिव संतोष जीवतोडे, केशव माटे, धर्मवीर गराडकार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.