बोगस लोखंडी बंडीची नियमबाह्यदुरुस्ती सुरू

By Admin | Updated: November 3, 2015 00:32 IST2015-11-03T00:32:44+5:302015-11-03T00:32:44+5:30

जिल्हा परिषदेला कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुरवठा केलेल्या बैलबंडी कमी वजनाच्या व निकृष्ठ दर्जाच्या असल्याचा आरोप ..

Regulation of bogus iron rods restarted | बोगस लोखंडी बंडीची नियमबाह्यदुरुस्ती सुरू

बोगस लोखंडी बंडीची नियमबाह्यदुरुस्ती सुरू

अविनाश जाधव यांचा आरोप : बंडी घोटाळ्याची लपवाछपवी
राजुरा : जिल्हा परिषदेला कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुरवठा केलेल्या बैलबंडी कमी वजनाच्या व निकृष्ठ दर्जाच्या असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य अविनाश जाधव यांनी केल्यानंतर उजेडात आलेला लोखंडी बंडी घोटाळा सध्या गाजत आहे. दरम्यान, जि.प. सर्वसाधारण सभेने या बंडी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले असताना अधिकारी व पुरवठाधारक यांच्या संगनमतातून नियमबाह्य पद्धतीने बंडी दुरुस्तीचा धडक कार्यक्रम पुरवठाधारक यंत्रणा करीत असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेतील अनेक योजनांत सुरू असलेल्या गैरव्यवहाराच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी जि.प.ची विशेष सभा लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे अनेक घोटाळे जनतेच्या समोर येणार असल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे.
कृषी विभागातर्फे लोखंडी बंडी पुरवठ्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून लोखंडी बंडी निकृष्ठ दर्जाची असल्याने सध्या चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. यामुळे अधिकारी व पुरवठाधारक हादरून गेले असून चौकशी झाल्यास अधिकारी निलंबित होतील व पुरवठाधारक काळ्या यादीमध्ये जातील, या भितीने नियमबाह्य पद्धतीने लोखंडी बंडीची दुरुस्तीचा धडक कार्यक्रम राबविला जात असल्याचा अविनाश जाधव यांचा आरोप आहे. सध्या पं.स. स्तरावर काही बंड्या पडून असून त्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी सदर बंड्या दुरुस्त करण्याचे पत्र वरिष्ठांकडून आले नाही, हे स्पष्ट केले. त्यामुळे पुरवठाधारकाने बंडी दुरुस्त करण्याचा सपाटा कोणाच्या आदेशाने सुरू केला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे लोखंडी बंडी घोटाळा बाहेर निघाला असताना व त्याची चर्चा जि.प. सर्वसाधारण सभेत सुरू असताना कृषी विभाग व वित्त विभागाचे अधिकारी मात्र पुरवठाधारकास ७५.७३ लाख रुपयांचे धनादेश अदा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी वाहुले यांनी लोखंडी बंडी घोटाळ्याची चौकशी केली. मात्र चौकशी अहवालाची मागणी करूनसुद्धा अद्यापही तो दिला नसल्याचा जाधव यांचा आरोप आहे. या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी अविनाश जाधव व जिल्हा परिषद सदस्य संदीप गड्डमवार केली आहे. चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यानंतर आता कारवाईच्या भितीने बंडी दुरुस्तीचा सपाटा सुरू केला आहे. यामुळे यामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद प्रशासन गुंतले असून सर्व मिळून संगणमत करून प्रकरण दडपू पाहत आहेत, असा आरोप जाधव यांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Regulation of bogus iron rods restarted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.