खासगी कामासाठी नदीतील पाण्याचा सर्रास वापर
By Admin | Updated: April 21, 2015 01:01 IST2015-04-21T01:01:23+5:302015-04-21T01:01:23+5:30
दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत आहे. उमा नदीवरील असलेल्या पाण्याच्या पात्रात घट होत असताना मात्र तालुका

खासगी कामासाठी नदीतील पाण्याचा सर्रास वापर
मूल : दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत आहे. उमा नदीवरील असलेल्या पाण्याच्या पात्रात घट होत असताना मात्र तालुका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे खासगी कामासाठी इंजिनद्वारे नदीचे पाणी टँकरमध्ये भरून नेले जात आहे.
पाण्याची पातळी खालावत असल्याने गुराढोरांना पाणी मिळणे कठीण होत असताना खाजगी कामासाठी होणारा पाण्याचा वापर त्वरित बंद करावा, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष अतुल गोवर्धन, उपाध्यक्ष गणेश पुण्यप्रेडीवार व शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तालुका प्रशासनाला दिला आहे.
एप्रिल-मे महिन्यात दरवर्षी नदीवरील पाण्याची पातळी घटत असते. त्यामुळे नदीजवळील शेतकऱ्यांनी पाणी शेतीसाठी वापरू नये यासाठी शासन स्तरावरून कडक पाऊले उचलली जातात. पाण्याची पातळी घटल्याने दररोज नदीवर येणाऱ्या गुराढोरांना पाणी मिळणे कठीण होत असते. यासाठी तालुका प्रशासनाकडून दरवर्षी नदीजवळील शेतकऱ्यांना नोटीस बजावून नदीतील पाणी न घेण्याची तंबी दिली जाते. मात्र शेतकऱ्यांपेक्षा खासगी काम करणारे कंत्राटदार उमा नदीवरील पाणी ट्रक व ट्रॅक्टरवर सर्रासपणे दिवस-रात्र नेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नदीतील पाण्याची पातळी खालावत असताना खासगी कामासाठी पाणी वापरणे कितपत योग्य असल्याचा प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. कंत्राटदारांनी कामासाठी खासगी विहिरी वा इतर मार्गातून पाणी वापरावे. मात्र नद्यासारख्या नैसर्गिक स्रोतातील पाणी वापरू नये. गुराढोरांना पाण्यासाठी भटकण्याची पाळी येऊ शकते. यासाठी तहसीलदार यांनी त्वरित लक्ष घालून नदीतून होणारी पाण्याची वाहतूक बंद करावी. या उप्परही ते ऐकत नसल्यास कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी मनसेचे मूल तालुकाध्यक्ष अतुल गोवर्धन, गणेश पुण्यप्रेडीवार यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)