राज्याचे सचिव जिवती येथे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:50 IST2017-08-13T23:49:57+5:302017-08-13T23:50:37+5:30
मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण परदेशी यांनी आज रविवारी जिवती तालुक्यात दाखल होत विकासकामांबाबत विविध विभागातील अधिकाºयांशी चर्चा केली.

राज्याचे सचिव जिवती येथे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण परदेशी यांनी आज रविवारी जिवती तालुक्यात दाखल होत विकासकामांबाबत विविध विभागातील अधिकाºयांशी चर्चा केली.
जिवती तालुक्याच्या विकासकामात अडथळे येत असल्याने आमदार अॅड. संजय धोटे यांच्या पुढाकाराने मुंबई येथे मुंख्यमंत्री यांच्या आदेशानुसार ३ आॅगस्ट रोजी बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस पाऊल उचलत आपले सचिव प्रविण परदेशी यांना जिवती येथे पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने रविवारी प्रविण परदेशी यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल व वनविभागाचे उपवनसंरक्षक आणि आ. अॅड. संजय धोटे यांच्यासह जिवती येथे दौरा करून विकासकामात येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. तालुक्यातील महसूल व वनविभागाशी महत्वपूर्ण चर्चा केली.
बंद पडलेल्या तलावासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर पूर्वीपासून वनेत्तर वापरात असलेले ३३,१२८.८३ हेक्टर क्षेत्राच्या निर्वनीकरणाचा प्रस्ताव झुडपी जंगल प्रस्तावाप्रमाणे सुलभ कार्यपद्धतीद्वारे केंद्र शासनाकडे पाठविण्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी परदेशी यांनी नविन जंगलतोड करण्यावर आळा घालण्याचा सल्ला दिला. सध्या ताबा असलेल्या जमिनीतील उत्पादन कसे वाढविता येईल, याबाबतही चर्चा करण्यात आली. निर्वनीकरणाचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठविण्याचे आदेश परदेशी यांनी दिले. याप्रसंगी वनविभागाचे व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.