प्रादेशिक पाणीपुरवठा नळयोजना कुचकामी

By Admin | Updated: May 5, 2016 01:29 IST2016-05-05T01:29:51+5:302016-05-05T01:29:51+5:30

पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज. याठिकाणी शासनाची प्रादेशिक नळयोजना अस्तित्वात आहे.

Regional Water Supply Troubleshooting | प्रादेशिक पाणीपुरवठा नळयोजना कुचकामी

प्रादेशिक पाणीपुरवठा नळयोजना कुचकामी

तीन गावात पाणी टंचाई : नागरिक त्रस्त
देवाडा (बु) : पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज. याठिकाणी शासनाची प्रादेशिक नळयोजना अस्तित्वात आहे. या योजनेत देवाडा बुज. गावासह बोंडाळा बुज., बोंडाळा खुर्द आदी गावे अंतर्भूत आहेत. परंतु, तिन्ही गावातील पाणीपुरवठा मागील एक महिन्यापासून कायमचा बंदस्थितीत असल्याने या गावातील नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे.
उन्हाच्या तीव्र दाहकतेने परिसरातील पाण्याचे जलस्त्रोत आटले असून जलवहिन्या ठप्प झाल्या. गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असल्याने येथील महिला वर्ग व सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकण्याची पाळी आली आहे. तीनही गावात पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी हाहाकार असल्याने पिण्याच्या पाण्याची सर्वत्र झळ पोहचली आहे.
जनावरांनासुद्धा पाणी मिळणे या गावात कठीण काम झाले आहे. पाणी हे जीवन असून पाण्याविना जीवन कासाविसा होत असते. पिण्याच्या पाण्याची मूलभूत गरज समजल्या जाऊन त्याची पूर्तता करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. परंतु शासनाचा पाणीपुरवठा विभागाने उन्हाळ्याच्या दिवसातच दुर्लक्ष केल्याने पाणी टंचाईची समस्या गावात निर्माण झाली आहे. या मात्र अधिकारी मुद्दाम डोळेझाक करीत असल्याचे आरोप नागरिकांकडून केल्या जात आहे.
जिल्हा प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभाग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरवून पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यास असमर्थ ठरले आहे. तीनही गावातील जनतेला पिण्याच्या पाण्याची भटकंती करावी लागत असल्याने प्रशासनाप्रती असंतोषाची लाट पसरली आहे. त्यामुळे घागर मोर्चा काढण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
गावात पाणी टंचाई असल्याने देवाडा बुज. येथील नागरिक एक किमी अतरावर असलेल्या वैनगंगा उपनदीकडे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू केली आहे. काही जण तर चक्क बैलबंडी जुंपून पाणी आणत आहेत. परिसरात पाणी टंचाईचा प्रश्न बिकट असून पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहे की काय असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे.
याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन गावातीलल पाणी समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Regional Water Supply Troubleshooting