राजकीय बळावर संरक्षित जागेवर ताबा

By Admin | Updated: February 9, 2016 00:50 IST2016-02-09T00:50:01+5:302016-02-09T00:50:01+5:30

राजकीय बळाचा वापर करून संरक्षीत असलेल्या जागेचा बोगस पट्टा मिळविल्याचा प्रकार देवाडा खुर्द येथे उजेडात आला आहे.

Regarding control of the protected place on political power | राजकीय बळावर संरक्षित जागेवर ताबा

राजकीय बळावर संरक्षित जागेवर ताबा

गावकऱ्यांची तक्रार : अतिक्रमण हटविण्याची मागणी
पोंभुर्णा : राजकीय बळाचा वापर करून संरक्षीत असलेल्या जागेचा बोगस पट्टा मिळविल्याचा प्रकार देवाडा खुर्द येथे उजेडात आला आहे. अतिक्रमण धारकाने ट्रक्टरच्या साह्याने कुंपण तोडल्याने गुरे ठेवण्याचा मोठा प्रश्न देवाडा खुर्द येथील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
देवाडा खुर्द येथील नागरिकांच्या वहीवाटीच्या आणि गुरेढोरे ठेवण्याच्या व इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या शासकीय जागेवर वडीलोपार्जीत कुठलेही अतिक्रमण किंवा रेकार्डला नाव नोंद नसताना केवळ अधिकाऱ्यांना व दलालाला हाताशी धरून पट्टा मिळविण्यात आला. त्यानंतर राजकीय बळावर गावकऱ्यांचे गुरेढोरे ठेवण्याच्या संरक्षण कुंपणास अतिक्रमण धारकाने ट्रॅक्टर लावून उद्धवस्त केले.
देवाडा खुर्द येथील सर्वे नं. २९६ मधील सातबारावर १०.०० हे.आर. जागा नोंद होती. सदर जागेपैकी ६.०० हे.आर. जागा शंकरपट व जि.प. शाळेच्या क्रिडांगणासाठी नोंद आहे. तसेच १.०५ हे.आर. जागा जि.प. शाळेसाठी राखीव आहे आणि उर्वरीत जागा गावातील इंदिरा आवास योजनेकरिता, ढोरफोडीकरिता व चराईकरिता असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यातील काही जागेवर गेल्या १०० वर्षाच्या पूर्वीपासून गावातील गुरेढोरे ठेवण्यासाठी कुंपणाचे संरक्षण करून त्यात गुराखी संपूर्ण जनावरे ठेवत असतात. यालाच लागून जिल्हा परिषद शाळेची इमारत आहे.
सदर रिकाम्या जागेवर अनेक दिवसांपासून शाळेतील मुलांनी मैदान बनविले आहे. तिथे मुले क्रिकेट व इतर खेळ खेळत असतात. आजपर्यंत या जागेवर अतिक्रमण करण्याची कुणीही हिंमत केली नाही. परंतु येथील रहिवासी पुंडलिक कवडू बुरांडे यांनी तत्कालीन सरपंच चेपाजी मठ्ठे व उपसरपंच सोमेश्वर कुंदोजवार यांना हाताशी धरून संबंधीत जागेचा बोगस ठराव तयार केला. त्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांशी आर्थिक व्यवहार केला. त्यानंतर राजकीय बळावर बनावट कागदपत्र तयार करून १.२१ हे.आर. जागेचा तत्कालीन उपविभागीय अधिकारी पराते यांच्याकडून बोगस पट्टा मिळविला. सदर जागेवर ट्रॅक्टर लावून धान शेतीचे बांध काढले. ही माहिती गावकऱ्यांनी सरपंच विलास मोगरकर यांना दिली.
त्यानुसार मोगरकर यांनी गावातील काही व्यक्तींना घेऊन पाहणी करण्यासाठी गेले असता, बोगस पट्टे धारकांच्या कुटुंबातील व्यक्तींनी कुऱ्हाडी घेऊन मारण्यासाठी धावले होते. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणाहून माघारी येऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. याबाबत लेखी निवेदन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी म्हैसेकर व इतर अधिकाऱ्यांना दिले आहे. यावर काय कारवाई होणार याकडे देवाडावासीयांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
देवाडा खुर्द येथील बोगस पट्टेधारक पुंडलिक कवडू बुरांडे यांनी विद्यार्थ्यांना खेळण्याच्या मैदानावर अतिक्रमण करून बोगस पट्टा मिळविला असल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी इतर ठिकाणी खुली जागा नाही. त्यामुळे त्यांना अडचण निर्माण होत असून बोगस पट्टा रद्द करून खेळाच्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे, यासाठी देवाडा खुर्द येथील जि.प. शाळा व राष्ट्रमाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

Web Title: Regarding control of the protected place on political power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.