अधिकाऱ्याविना आरोग्य केंद्राचा कारभार वाऱ्यावर
By Admin | Updated: June 20, 2015 01:57 IST2015-06-20T01:57:07+5:302015-06-20T01:57:07+5:30
आंध्र-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या राजुरा तालुक्यातील चिंचोली (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या १५ दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी गैरहजर ...

अधिकाऱ्याविना आरोग्य केंद्राचा कारभार वाऱ्यावर
विरुर (स्टे) : आंध्र-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या राजुरा तालुक्यातील चिंचोली (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या १५ दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने गर्भवती प्रसुतीसाठी महिलांना घरीच किंवा खासगी रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागत आहे. येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अनियमितपणा, औषधांचा तुटवडा यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. वैद्यकीय अधिकारीच नसल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आल्या पावली परत जावे लागत आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव, शेतकरी, शेतमजूर, कामगार वास्तव्याला आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याने परिसरातील गरीब रुग्णांना उपचारासाठी पदरमोड करून खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ेदुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येक प्रसुती ही शासकीय रुग्णालयातच व्हावी, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. मात्र तसे होत नाही. प्रसुतीसाठी गर्भवती महिलांना आरोग्य केंद्रात आणले असता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याने गर्भवती महिलांना घरीच प्रसुती करून घ्यावी लागते. प्रसंगी खासगी रुग्णालयात जावे लागते. या आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका चालकाचे पद मागील कित्येक महिन्यांपासून रिक्त आहे.
या आरोग्य केंद्रात २२ कर्मचारी कार्यरत असले तरी केवळ एक परिचारिका व एक दोन कर्मचारी मुख्यालयी राहतात. आठ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. उर्वरित कर्मचारी बाहेर गावावरुन येणे-जाणे करतात. तसेच येथील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली झाली. १५ दिवसांचा कालावधी होऊनही त्यांच्या जागी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. या आरोग्य केंद्रावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने येथील कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत आहे.
विरुर स्टेशन येथे पोलीस ठाणे आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना कधीही आरोग्य केंद्राची गरज भासते. मात्र कधी-कधी वैद्यकीय अधिकारी नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच रुग्णांनासुद्धा आल्यापावली उपचाराविना परत जावे लागते. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. मात्र मात्र त्या निवासस्थानात अधिकारी राहत नाहीत. रुग्णवाहिका असेल तर चालक नाही. चालक असेल तर वाहनात इंधन नाही, अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होते. अशी केविलवाणी स्थिती चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राची झाली आहे. येथील दोन वैद्यकीय अधिकारी व रिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरावी, अशी मागणी माजी सरपंच धनराज चिंचोलकर, सरपंच बंडू रामटेके, राजकुमार ठाकूर, तंटामुक्त अध्यक्ष पांडुरंग वडस्कर, स्वामी सालगमवार, संतोष मेडपुरवार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
आरोग्य सेवेचा बोजवारा
ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. परंतु येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामचलाऊ धोरणामुळे तसेच आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. १९८२ साली स्थापन झालेल्या या आरोग्य केंद्रात एकूण २८ गावांचा समावेश आहे. जवळपास ३० हजारांपेक्षा अधिक नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. परंतु अपुरा औषधसाठा व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या गैरहजेरीमुळे बाहेरगावावरुन आलेल्या रुग्णांना उपचाराविना परत जावे लागत आहे.