रुग्णालयातून मृतदेहही ‘रेफर टू चंद्रपूर’
By Admin | Updated: February 26, 2015 00:46 IST2015-02-26T00:46:49+5:302015-02-26T00:46:49+5:30
जखमी रुग्णांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयातून रेफर करण्याची परंपरा मागील कित्येक वर्षांपासून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कायम राखली आहे.

रुग्णालयातून मृतदेहही ‘रेफर टू चंद्रपूर’
वरोरा : जखमी रुग्णांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयातून रेफर करण्याची परंपरा मागील कित्येक वर्षांपासून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कायम राखली आहे. आता तर मृतदेहदेखील रेफर टू चंद्रपूर’ केले जात असल्याने उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे उदघाटन झाल्यानंतर कधीही पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी व तंत्रज्ज्ञांची पदे भरण्यात आली नाही. कधी वैद्यकीय अधिकारी उपस्थित असले तर यंत्र नादुरुस्त असतात तर कधी यंत्र दुरुस्त करून आणलेले असले की वैद्यकीय अधिकारी नसतात. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या बहुतांश रुग्णांना चंद्रपूरला रेफर केले जाते. मंगळवारी माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाच्या गळ्याभोवती दोर आवळला होता. पोलिसांनी मृतदेह वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला. मात्र मृतदेहही चंद्रपूरला पाठविण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)