रत्नापुरात साकारलाय दिल्लीचा लाल किल्ला
By Admin | Updated: October 15, 2015 01:08 IST2015-10-15T01:08:13+5:302015-10-15T01:08:13+5:30
सिंदेवाही तालुक्यातील श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी दिल्लीच्या लालकिल्याची प्रतिकृती आणि आदर्श ग्राम संकल्पनेपवर आधारित ...

रत्नापुरात साकारलाय दिल्लीचा लाल किल्ला
नवरगाव: सिंदेवाही तालुक्यातील श्री गुरुदेव नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी दिल्लीच्या लालकिल्याची प्रतिकृती आणि आदर्श ग्राम संकल्पनेपवर आधारित विविध आकर्षक देखाव्याची निर्मिती केली आहे. जिल्ह्यातून बहुसंख्य नागरिक दर्शनासाठी येत आहेत.
मागील १० वर्षापासून विविध देखावे या मंडळाने तयार केले असून ते आकर्षणाचे केंद्र ठरले होते. दरवर्षी लाखो भाविक या मंडळाचा दुर्गोत्सव पाहण्यासाठी येत असतात. मात्र यावेळी ११ वे वर्ष असून दिल्लीच्या लाल किल्ल्याचा देखावा तयार केलेला आहे. ८००० चौरस फूट जागेवर भद्रावतीचे भास्कर फाये यांनी ही कलाकृती तयार केली असून किल्ल्याच्या पटांगणात बगीचा तयार करण्यात आला आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आदर्श गावाची संकल्पना विविध मूर्तीच्या माध्यमातून दर्शविलेली आहे. ग्रामसभा, शिक्षण, पूर्वीच्या काळात असलेली बारा बलुतेदार पद्धती, सांडपाण्याचे व्यवस्थापन, जलसंधारण, खतनिर्मिती, दारूमुक्ती, व्यसनमुक्ती, वाचनालय, वृक्षसंवर्धन या सर्व घटकांचे मानवी जीवनातील महत्व मूर्तीमधून सजीव केले आहे. आणि गाभाऱ्यामध्ये मुख्य दुर्गामातेची मूर्ती बसविली आहे.
या दुर्गात्सवाच्या निमित्ताने विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे. अंधश्रद्धा निर्मूनल, रक्तदान शिबिर, किशोरवयीन मुलींचे हिमोग्लोबिन तपासणी व सिकलसेल तपासणी, १६ आॅक्टोबरला विदर्भस्तरीय एकल व समूहनृत्य स्पर्धा, १८ आॅक्टोबरला विनामुल्य मोतीबिंदू व डोळे तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर असे चांगले उपक्रम घेतलेले आहेत.
तसेच मेला लागलेला असून विविध झुल्यांसह, प्रात्यक्षिक बघायला मिळत आहे. गाढव म्हणजेच अज्ञान असे समजले जात असलेतरी मेल्यामध्ये आणलेले गाढव आपल्या सज्ञानामुळे आकर्षण ठरत आहे. या सर्व प्रकारामुळे भाविकांचे मनोरंजन होत आहे. भाविकांनी दुर्गोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक पं.स. उपसभापती रमाकांत लोधे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे. (वार्ताहर)