मूर्तीची माती अन् निर्माल्यावर पुनर्प्रक्रिया
By Admin | Updated: September 11, 2016 00:41 IST2016-09-11T00:41:29+5:302016-09-11T00:41:29+5:30
गणेशोत्सव व दुर्गात्सवदरम्यान मूर्ती विसर्जन व निर्माल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते.

मूर्तीची माती अन् निर्माल्यावर पुनर्प्रक्रिया
जनजागृतीचा प्रभाव : जलप्रदूषण टळणार आणि बचतही होणार
चंद्रपूर : गणेशोत्सव व दुर्गात्सवदरम्यान मूर्ती विसर्जन व निर्माल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. जलस्रोत दूषित होऊन जलचर प्राण्यांनाही धोका निर्माण होतो. हे जलप्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्यकुंड व कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली असून भाविकही याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. यामुळे आता केवळ जलप्रदूषणच टळणार नसून मूर्तीच्या मातीवर व निर्माल्यांवर पुनर्प्रक्रिया होऊन त्याचाही चांगला उपयोग केला जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सव व दुर्गात्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सुमारे पाच हजार घरगुती गणेशमूर्तीसह साडेतीनशे सार्वजनिक मंडळाद्वारे चंद्रपुरात गणरायाची स्थापना केली जाते. चंद्रपुरात मूर्ती विसर्जनासाठी इरई नदी व रामाळा तलावाचाच उपयोग केला जातो. इरई नदी ही चंद्रपूरची जीवनदायिनी आहे. इरई नदीचेच पाणी चंद्रपूरकर पितात. एवढ्या मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तीचे विसर्जन करताना इरई नदी व रामाळा तलाव प्रदूषित होते. जलप्रदूषणामुळे जलचर प्राण्यांनाही धोका निर्माण होऊन अनेकदा ते मृत्यूमुखीही पडतात. हे टाळण्यासाठी मागील काही वर्षांपासून जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन, सामाजिक संघटना जनजागृती करीत आहे.
पूजेदरम्यान निघालेले निर्माल्य नदीत विसर्जित न करता कुंडात टाकावे, यासाठी मनपातर्फे शहरात ठिकठिकाणी निर्माल्य कुंड ठेवले आहे. मूर्ती विसर्जनासाठी २० ठिकाणी कृत्रिम तलावही उपलब्ध करण्यात आले आहे. जनजागृतीमुळे लोकांनाही ही बाब पटली असावी. कारण गणेशोत्सवाच्या या पाच दिवसात अनेकांनी कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन केले आहे. याशिवाय निर्माल्यकुंडातच निर्माल्य टाकले जात आहे.
विशेष म्हणजे, या कृत्रिम तलाव विसर्जित झालेल्या मूर्तीची माती पुन्हा उपयोगात आणली जाणार आहे. गणेशमूर्ती विसर्जित झाल्यानंतर काही वेळाने ती विरघळलेली माती बाहेर काढून चुंगड्यामध्ये भरून ठेवली जाते. ही अस्सल माती पुन्हा कुंभार समाजबांधव व मूर्तीकारांना विनामुल्य दिली जाते. त्या मातीतून मूर्तीकार पुढे शारदा देवी, दुर्गा देवींच्या मूर्ती साकारतात. पुन्हा या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित होऊन मूर्तीकारांना माती दिली जाते. त्यातून कुंभार समाज बांधव दिवाळीच्या आरासात कामी येणाऱ्या पणत्या, दिवे तयार करतात. याशिवाय उन्हाळ्यात गरिबांचा फ्रिज म्हणजे माठ तयार करण्यासाठीसुध्दा याच मातीचा वापर केला जातो. यामुळे वारंवार मातीचे उत्खनन होत नाही. (शहर प्रतिनिधी)
निर्माल्यापासून सेंद्रीय खत
मनपाच्या निर्माल्य कुंड संकल्पनेला रोटरी क्लबनेही सहकार्य करीत निर्माल्यापासून सेंद्रीय खत निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती देताना रोटरी क्लबचे प्रकल्प निदेशक अमित पोरेड्डीवार यांनी सांगितले की निर्माल्य कुंडातील निर्माल्य दाताळा मार्गाावरील एका फार्महाऊसवर जमा केले जात आहे. या ठिकाणी मोठा खड्डा तयार करून त्यात हे निर्माल्य टाकण्यात येणार आहे. त्यानंतर विशिष्ट केमीकलद्वारे या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार करण्यात येणार आहे. खताचे पॉकिटे तयार करून ते नागरिकांनाच घरगुती बगिचा, घरातील कुंड्यांमध्ये टाकण्यासाठी विनामुल्य पुरविले जाणार आहे,असे पोरेड्डीवार यांनी सांगितले.
१९९० मध्ये राबविली होती निर्माल्य कुंडाची संकल्पना
निर्माल्यामुळे जलप्रदूषण होऊ नये, म्हणून १९९० मध्येच चंद्रपूर सोशल अकादमीच्या वतीने निर्माल्य कुंडाची संकल्पना राबविली होती, अशी माहिती चंद्रपूर सोशल अकादमीचे पदाधिकारी व नगरसेवक संजय वैद्य यांनी दिली. त्यावेळी लाकडाच्या सेंट्रींगचे मोठे टाके तयार करून त्याला कापड गुंडाळले होते. त्यावेळीही नागरिकांनी या संकल्पनेला प्रतिसाद देत निर्माल्य कुंडातच टाकले होते. कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन केल्याने केवळ जलप्रदूषणच टळणार नसून यामुळे मूर्तीकारांना विनामुल्य माती मिळणार आहे. कृत्रिम तलाव हे चौकाचौकात उपलब्ध केले असल्याने याचा भाविकांनाही फायदा होणार आहे. भाविकांना विसर्जनासाठी लागणारा वाहतुकीचा खर्च वाचून पैशाची बचत होणार, असेही संजय वैद्य यांनी सांगितले.