मांगली येथील अंगणवाडी सेविका भरती रद्द
By Admin | Updated: March 20, 2017 00:30 IST2017-03-20T00:30:40+5:302017-03-20T00:30:40+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे मांगली येथे करण्यात आलेली अंगणवाडी सेविकेची नियुक्ती अखेर रद्द करण्यात आली आहे.

मांगली येथील अंगणवाडी सेविका भरती रद्द
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश : बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी प्रकरण
नागभीड : बनावट कागदपत्रांच्या आधारे मांगली येथे करण्यात आलेली अंगणवाडी सेविकेची नियुक्ती अखेर रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती रद्द करण्यात आली. या प्रकरणी तत्कालीन चौकशी अधिकारी व मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.जी. पुरी यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर न केल्याचे ताशेरेही ओढण्यात आले आहेत.
मांगली येथील अंगणवाडी सेविकेच्या पदासाठी इच्छुक असलेल्या पात्र-अपात्र उमेदवारांची यादी १४ जानेवारी २०१६ रोजी प्रकाशित करण्यात आली. या यादीत विना प्रशांत पालपणकर यांना अपात्र म्हणून घोषित करण्यात आले होते. तरीही पालवणकर यांना नियुक्ती आदेश देण्यात आले. या नियुक्तीवर प्रिती संजय माकोडे यांनी आक्षेप घेतला. पण कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यानंतर प्रिती माकोडे व शालू चौधरी यांनी ६ फेब्रुवारी रोजी पुन्हा तक्रार केली.
या तक्रारीनंतर मूल पं.स. चे तत्कालीन गटविकास अधिकारी एस.जी. पुरी यांची चौकशी समिती नेमण्यात आली. पण त्यांनी थातूरमातूर चौकशी करून आपला अहवाल नागभीडच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सादर केला. दरम्यान प्रिती माकोडे यांनी आपल्या वकीलामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पुन्हा तक्रार केली. या तक्रारीवर १८ आॅक्टोबर २०१६ रोजी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, या भरती प्रक्रियेत शासन निर्णय निकषाचे पालन झाले नाही व एस.जी. पुरी यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला नसल्याचे निष्पन्न झाले. यानंतर ३ फेब्रुवारी २०१७ ला आणखी अपिलार्थी व गैरअपिलार्थी यांचे यांचे म्हणणे ऐकून घेत भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
विना पालपणकर यांनी शासनाची फसवणूक केली आहे. पालपणकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व उचललेले मानधन परत घेण्यात यावे. त्याचबरोबर चौकशी अधिकारी एस.जी. पुरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मी पाठपुरावा करणार आहे.
- रवी देशमुख, सभापती, पं.स. नागभीड.
अंगणवाडी सेविका पदाची भरती प्रक्रिया नव्याने न राबविता जुन्याच अर्जदारांमधून अंगणवाडी सेविकेची निवड करावी. यातून वेळेचा अपव्यय टाळावा.
- प्रिती संजय माकोडे, अपिलाथी.