वाहनधारकांकडून केली १९.५६ लाखांची वसुली
By Admin | Updated: October 16, 2015 01:25 IST2015-10-16T01:23:29+5:302015-10-16T01:25:19+5:30
वाहन चालविण्याबाबत कितीही कठोर नियम असले तरी वाहनधारकांकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी केलीच जात नसल्याचे चित्र आहे.

वाहनधारकांकडून केली १९.५६ लाखांची वसुली
आठ महिन्यांतील कारवाई : ९० टक्के वाहनधारकांकडून होतेयं नियमांचे उल्लंघन
चंद्रपूर: वाहन चालविण्याबाबत कितीही कठोर नियम असले तरी वाहनधारकांकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी केलीच जात नसल्याचे चित्र आहे. गेल्या आठ महिन्यात चंद्रपूरच्या वाहतूक शाखेने १९ हजार ३९० वाहनांवर कारवाई करून वाहनधारकांकडून १९ लाख ५६ हजार १७१ रुपयांचा दंड वसुल केला.
चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नेहमीच चंद्रपुरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्याने वाहन चालविताना काही नियम तयार करण्यात आले आहे. वाहन चालविताना कोणतीही दुर्घटना होऊ नये, किंवा कोणत्याही अनुचित घटनेला सामोरे जाण्याचा प्रसंग येऊ नये, हा ते नियम बनविण्यामागील उद्देश आहे. परंतु ९० टक्के लोकांकडून नियमांचे पालनच केले जात नसल्याचे दिसून येत आहे. वाहन चालविण्याचा परवाना देताना प्रादेशिक परिवहन विभागाकडून चालकाला नियमांबाबत अवगत केले जाते. त्याच्या हातून कुठलाही अपघात होऊ नये, यासाठी त्याला योग्य मार्गदर्शन केले जाते. मात्र नंतर वाहनचालकाला त्या नियमाचा विसर पडतो. रस्त्यावरून वाहन चालविताना नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाईदेखील केली जाते. परंतु वाहनचालकांवर या कारवाईचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही.
केवळ चंद्रपूर शहरातील कारवाईच्या आकडेवारीवरून नजर फिरविली असता, येथे वाहनचालकांकडून किती मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन केले जाते. ही बाब लक्षात येते. चंद्रपूर येथील वाहतूक शाखेने गेल्या आठ महिन्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १९ हजार ३९० वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून १९ लाख ५६ हजार १७१ रुपयांचा दंड वसुल केला. चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, चेहऱ्या स्कार्फ बांधून वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, ट्रीपल सीट वाहन चालविणे, ध्वनी आणि वायू प्रदूषण करणे आदींबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाकडून अनेकदा कारवाईची मोहिम आरंभली जाते. अनियंत्रीत वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत. मात्र या उपरांतही वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. गंभीर बाब म्हणजे नियम तोडणाऱ्यांमध्ये युवावर्गाचा अधिक समावेश आहे. वेगाने वाहने चालविण्याचा प्रकार शहरात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातूनच अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. (प्रतिनिधी)