पाणी पुरवठ्याला पुन्हा ग्रहण
By Admin | Updated: July 9, 2017 00:41 IST2017-07-09T00:41:00+5:302017-07-09T00:41:00+5:30
चंद्रपूरच्या पाणी पुरवठ्याबाबत वारंवार ओरड होत आहे. नागरिकांसह नगरसेवकही याबाबत संतप्त आहेत.

पाणी पुरवठ्याला पुन्हा ग्रहण
नागरिक वैतागले : दोन दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरच्या पाणी पुरवठ्याबाबत वारंवार ओरड होत आहे. नागरिकांसह नगरसेवकही याबाबत संतप्त आहेत. असे असतानाही पाणी वितरण व्यवस्था अजूनही सुरळीत झालेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपुरातील अनेक भागात पाणी पुरवठा ठप्प आहे. यामुळे नागरिक वैतागले असून अनेकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
दिवसेंदिवस चंद्रपूर शहराचा व्यास वाढत चालला आहे. लोकसंख्याही चार लाखांच्या घरात गेली आहे. चंद्रपुरातील महानगरपालिका अस्तित्वात आल्यामुळे पुढे आणखी शहराच्या सीमा वाढणार आहे. असे असले तरी या शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन ५० ते ६० वर्ष जुनी आहे. आता ती अत्यंत खिळखिळी झाली असून मनपा प्रशासनानेही ती कालबाह्य झाली असल्याचे मान्य केले आहे. मान्य केले असले तरी अद्याप ती बदलविण्यात आलेली नाही. या खिळखिळ्या पाईपलाईनमुळे अनेक वेळा तांत्रिक बिघाड होऊन पाणी पुरवठा ठप्प पडतो.
पूर्वी शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी नगरपालिकाच सांभाळत होती. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत नागरिक थेट पालिकेकडे तक्रार करीत होते. आणि त्याची वेळीच दखल घेतली जात होती. मात्र अलिकडच्या काळात पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले. उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला पाणी पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले आहे. खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या इरई धरणात बऱ्यापैकी जलसाठा आहे. तरीही पाणी पुरवठा अनियमित असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मागील दोन दिवसांपासून चंद्रपूर शहरातील काही वॉर्डाचा अपवाद सोडला तर बहुतांश वॉर्डातील पाणी पुरवठा ठप्प आहे. हॉस्पीटल वार्ड, सिव्हील लाईन, रामनगर, जगन्नाथ बाबा नगर, जीवन ज्योती कॉलनी परिसर, नगिना बाग परिसर, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वॉर्ड, भानापेठ वॉर्ड, बालाजी वॉर्ड, एकोरी वार्ड, घुटकाळा वॉर्ड, तुकुम परिसरातील वार्ड आदी भागात पाणी पुरवठा खंडित झाला. यातील काही वॉर्डात शुक्रवारी नळ आले नाही, पण शनिवारी आले. तर काही वॉर्डात शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी पाणी पुरवठा ठप्प होता.
नळाला पाणी कमीच
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात सध्या मुबलक पाणीसाठा असला तरी पाणी पुरवठा करताना तो मुबलक केला जात नाही. कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धारही मोठी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, नळ आल्यानंतर प्रारंभी काही वेळ दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. काही भागात तर केवळ अर्ध्या तासातच नळाची धार गुल होते, अशाही तक्रारी आहेत.
तक्रार केली की
आर्थिक भुर्दंड
नवीन कनेक्शन देऊन ही कंत्राटी कंपनी मोकळी होते. पुढे त्या कनेक्शनधारकाला व्यवस्थित पाणी मिळत आहे की नाही, हे पाहण्याचे सौजन्यही दाखविले जात आहे. एखाद्याने पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली की काहीतरी तांत्रिक कारण सांगितले जाते व तक्रारकर्त्याला पुन्हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.