कारवाई न करता परस्पर ‘बकऱ्यावर’ समझोता
By Admin | Updated: August 30, 2015 00:44 IST2015-08-30T00:44:17+5:302015-08-30T00:44:17+5:30
जिल्ह्यात अवैध दारु विक्रीवर पोलिसांचे धाडसत्र सुरू असले तरी जिवती तालुक्यात मात्र अवैध धंद्याच्या बाबतीत स्थानिक पोलिसांची भूमिका विरोधाभासाची आहे.

कारवाई न करता परस्पर ‘बकऱ्यावर’ समझोता
संघरक्षित तावाडे जिवती
जिल्ह्यात अवैध दारु विक्रीवर पोलिसांचे धाडसत्र सुरू असले तरी जिवती तालुक्यात मात्र अवैध धंद्याच्या बाबतीत स्थानिक पोलिसांची भूमिका विरोधाभासाची आहे. या तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांची भूमिकाही अवैध धंदेवाल्यांच्या जोडीदाराची आहे, अशी तालुक्यातील जनतेची ओरड आहे. ही ओरड सार्थ ठरणारी घटनाही येथे उघडकीस आली. कारवाई न करता ‘बकरा’ घेऊन आरोपीसोबत समझोता करणाऱ्या या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे.
तालुक्यातून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या भोलापठार येथे पोलिसांनी एका व्यक्तीकडे गांजा पकडला. परंतु त्याच्यावर कारवाई न करता पोलिसांनी ‘सेटलमेंट’ ची भूमिका निभावली म्हणे. कारवाईच्या बदल्यात दहा हजार रुपये आणि घरचा एक बकरा पोलिसांनी घेतल्याची माहिती गावकऱ्यांच्याच चर्चेवरून मिळाली. तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर जिवती तालुका असून या सीमेवरुन दारुच नाही तर गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. पण यावर आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस यंत्रणा मजबुत नाही की तशी त्यांची इच्छाच नाही, हेच कळेणासे झाले आहे.
सीमेलगत असलेल्या गावात तेलंगणा राज्याची दारु मोठ्या प्रमाणात विकली जाते. पण कुणीच पकडला जात नाही. सीमेवरील रस्त्यांवर पोलीस असतातही. पण होत काहीच नाही. उलट ‘सेटलमेंट’ होतानाही लोकांनी पाहिले असल्याची चर्चा आहे. जे कोणी सदर प्रकार घडत असताना पाहतात, त्यांच्यावर दबाब येत असतो, असेही बोलले जात आहे. त्यात भोलापठार अपवाद नाही. या ठिकाणी एका व्यक्तीकडे पोलिसांनी गांजा पकडला, दहा हजार रुपये घेतले. एवढ्यावर हे पोलीस थांबले नाहीत तर त्याच्या घरी बांधून असलेला बकराही पोलिसांनी नेला. पण कुणालाही याचा थांगपत्ता लागला नाही. कायद्याचे रक्षक जर भक्षकाची भूमिका निभावत असतील तर सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांनी बकऱ्यावर केलेला समझौत्याची चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यात सुरू आहे, हे विशेष.