भाजपातील बंड शमले, चिमुरात बंडखोरी
By Admin | Updated: October 1, 2014 23:19 IST2014-10-01T23:19:22+5:302014-10-01T23:19:22+5:30
नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील सहाही मतदार संघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सहाही मतदार संघात मिळून १०७ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक मतदार चिमूर

भाजपातील बंड शमले, चिमुरात बंडखोरी
रिंगणात १०७ उमेदवार : चिमूर विधानसभेची जम्बो यादी
चंद्रपूर : नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील सहाही मतदार संघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सहाही मतदार संघात मिळून १०७ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक मतदार चिमूर विधानसभा मतदारसंघात असून सर्वात कमी उमेदवार चंद्रपूर विधानसभा मतदार संघात आहेत.
१५३ उमेदवारांपैकी बुधवारी ४५ उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतले. यामुळे रिंगणातील चित्र आता स्पष्ट झाले आहे. वरोरा मतदार संघामध्ये संजय देवतळे यांनी भाजपाची तिकीट स्विकारल्याने राजकारणात प्रचंड चर्चा सुरू झाल्या होत्या. स्थानिक भाजपा नेत्यांनी पहिल्या दिवशी बंडखोरीचा पवित्रा घेत संजय देवतळे यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र दोन दिवसातच बंड थंडावले आहेत. भाजपातील सहा पदाधिकाऱ्यांनी नामांकन दाखल केले होते. त्यातील एकाचे नामांकन कायम ठेवून भाजपा कार्यकर्ते त्याच्यां पाठीशी राहतील असे ठरले होते. मात्र भाजपा नेत्यांना वरोरातील बंड थंड करण्यात यश आले आहे.
चिमूरमध्येही अशीच स्थिती होती. तिथे पक्षातीलच चार जण उभे होते. मात्र तीघांनी आज बुधवारी नामांकन परत घेतले. असे असले तरी विलास दोनोडे यांनी आपले नामांकन कायम ठेवल्याने चिमूरमध्ये भाजपात बंडखोरी स्पष्ट दिसत आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात आरपीआयचे प्रमोद सोरते, रिपब्लिकन सेनेचे तथागत पेटकर यांच्यासह एकूण आठ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला.
आता या विधानसभा क्षेत्रात एकूण १३ उमेदवार रिंगणात आहेत. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून तीन जणांना अर्ज मागे घेतला. आता येथे एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत.
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसकडून उमेदवारी दाखल करणारे अरविंद जयस्वाल यांच्यासह पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. या क्षेत्रात आता १५ उमेदवार मैदानात आहेत. चिमूर विधानसभा मतदार संघातून १३ उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतले. यात भाजपाचे धनराज मुंगले, वसंत वारजूरकर, काँग्रेसचे सतीश वारजूकर यांचा समावेश आहे. आता या क्षेत्रात एकूण २९ उमेदवार रिंगणात आहेत. राजुरा मतदार संघातून तिघांनी आपले नामांकन परत घेतले. यात राष्ट्रवादीचे पंकज पवार, संदीप करपे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. या संघात १६ उमेदवार आपले नशिब अजमावणार आहेत.
वरोरा मतदार संघातून काँग्रेसचे विजय देवतळे व भाजपाचे ओम मांडवकर या प्रमुख उमेदवारांसह एकूण १३ उमेदवारांनी नामांकन परत घेतले. या संघात आता १८ उमेदवार रिंगणात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)