भद्रावती तालुक्यातील ९६ गावांमध्ये हागणदारीमुक्तीची रथयात्रा
By Admin | Updated: January 5, 2017 00:51 IST2017-01-05T00:51:10+5:302017-01-05T00:51:10+5:30
स्वच्छतेचे कैवारी संत संत गाडगेबाबा व मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला ...

भद्रावती तालुक्यातील ९६ गावांमध्ये हागणदारीमुक्तीची रथयात्रा
गावकऱ्यांत जनजागृती : तालुका हागणदारीमुक्तीचा संकल्प
भद्रावती : स्वच्छतेचे कैवारी संत संत गाडगेबाबा व मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिलेला स्वच्छतेचा व हागणदारी मुक्तीचा मुलमंत्र घेवून नंदोरी (बु) येथे आठवडाभर तालुका हागणदारी मुक्ती व स्वच्छता अभियान रथयात्रा राबविण्यात आली. या रथयात्रेचे आयोजन नंदोरी येथील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिवतोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रथयात्रेला हिरवी झेंडी दाखविली. रथयात्रा नंदोरीवरून पाटाला, माजरी, घोडपेठ, कोंढारोड, कोकेवाडा क्षेत्र, चंदनखेडा व चोरा क्षेत्र अशा जवळपास ९६ गावांमध्ये जावून रथयात्रेने संपुर्ण तालुका हागणदारी मुक्त करण्याचा संदेश दिला.
रथयात्रेच्या प्रसंगी संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज ग्रामसेवा समिती नंदोरी (बु) चे आयोजक नरेंद्र जिवतोडे, अंकुश आगलावे व सेवकराम मिलमिले प्रामुख्याने उपस्थित होते. रथयात्रेसाठी किशोर पुंड, यशवंत वाघ, विनोद सातपुते, मंगेश लोणारकर, प्रवीण ठेंगणे, मारोती गायकवाड, राजेश्वर भलमे, पावडे, खाते, घाटे व सर्व गुरूदेव भक्तांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची समाप्ती गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त करण्यात आली. हागणदारीमुक्त व स्वच्छता अभियान या विषयावर चर्चासत्र झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जि.प. अध्यक्ष संध्या गुरूनुले तर प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद कडू, सेवकराम मिलमिले, जि.प. सदस्य अर्चना जिवतोडे, वरोऱ्याचे नगराध्यक्ष एतेशाम अली, तहसीलदार सचिन कुमावत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)