राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणाचा चेहरामोहरा बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:53+5:302021-02-05T07:35:53+5:30
ब्रह्मपुरी: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील, तसेच नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाला लागून असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगणाची जागा शिक्षण संस्थेला ...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणाचा चेहरामोहरा बदलणार
ब्रह्मपुरी: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील, तसेच नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाला लागून असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगणाची जागा शिक्षण संस्थेला सन १९८० पर्यंत शासनाकडून लीजवरती देण्यात आली होती. मात्र, सदर जागेची लीज आता संपुष्टात आली असल्याने, ब्रह्मपुरी न.प.ने सुमारे तीन वर्षांपूर्वी सदर क्रीडांगण पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी संमत केला होता. त्याला अनुसरून तहसीलदार यांनी कार्यवाही केली होती, अशी माहिती नगराध्यक्षा रिता उराडे यांनी स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रपरिषदेत दिली.
सध्याच्या परिस्थितीत सदर क्रीडांगणाची जागा ही शासनाच्या मालकीची असल्याने, सदर जागा ब्रह्मपुरी नगरपरिषद आपल्या ताब्यात घेऊन भविष्यात या क्रीडांगणाचा विकास करून सुसज्ज असे भव्य क्रीडांगण व सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच सभा, समारंभ आयोजित करण्यासाठी सदर क्रीडांगणाचा परिसर विकसित केला जाईल. ब्रह्मपुरी नगरपरिषदेने विकास आराखडा तयार केला असून, भविष्यात या ठिकाणी वॉकिंग रूट, हॉकी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आदी खेळांसाठी सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचा न.प. चा मानस असून, यासाठी शासनस्तरावर निधीसाठी पाठपुरावा करणेही सुरू असल्याचे उराडे यांनी सांगितले, परंतु शहराचा विकास न पाहणाऱ्या काही स्वार्थी मंडळींकडून सदर क्रीडांगण हडपण्याचा प्रयत्न केला जात असून, भविष्यात या ठिकाणी व्यापारी गाळे तयार केले जाऊन विकल्या जातील आणि ब्रह्मपुरीवासीयांसाठी मोकळे मैदान उपलब्ध राहणार नाही, असे त्या म्हणाल्या. यावेळी बांधकाम सभापती विलास विखार, तसेच नगरसेवक उपस्थित होते.