ब्रह्मपुरीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण अखेर न.प.ला हस्तांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:53 IST2021-02-21T04:53:30+5:302021-02-21T04:53:30+5:30
सदर क्रीडांगणाचा सर्व्हे क्रमांक ४०५ असून आराजी ४.८५ हेक्टर आर. आहे. सदर क्रीडांगण ने. हि. शिक्षण संस्थेला महाराष्ट्र शासनाचे ...

ब्रह्मपुरीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण अखेर न.प.ला हस्तांतरित
सदर क्रीडांगणाचा सर्व्हे क्रमांक ४०५ असून आराजी ४.८५ हेक्टर आर. आहे. सदर क्रीडांगण ने. हि. शिक्षण संस्थेला महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षांकरिता लिजवर देण्यात आले होते. त्याची मुदत १९८४ मध्ये संपली होती. मैदानाचे नुतनीकरण करण्यात आले नव्हते. त्यामुळे क्रीडांगण नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून ताब्यात घेण्यासाठी ब्रह्मपुरी न.प.ने तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या कडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाला अनुसरून जिल्हाधिकारी यांनी हरकती मागविल्या होत्या. सहा महिन्यांपासून यावर चर्चा सुरू होती. यालरून राजकारणही चांगलेच तापले होते. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. मात्र शेवटी जिल्हाधिकारी यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत सदर क्रीडांगण ब्रह्मपुरी न. प. ला हस्तांतरित करण्याचा निकाल दिला आहे.
सुमारे २० कोटी रुपयांचा निधी खर्च करून या क्रीडांगणाचा चेहरामोहरा बदलविणार असल्याचे ब्रम्हपुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष रिताताई उराडे व गटनेते व बांधकाम सभापती विलास विखार यांनी सांगितले. सदर क्रीडांगणाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी सुमारे २० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. या क्रीडांगणावर जॅगिंग ट्रॅक, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, हॉकीसाठी विशेष मैदान तयार करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.