रोवणीचा धडाका; मात्र मजूरच मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:29+5:302021-07-21T04:19:29+5:30

शेतकरी पुन्हा हवालदिल : एकमेकांच्या शेतात जाऊन करतात कामे राजकुमार चुनारकर चिमूर : मागील काही दिवसांपूर्वी जोर धरलेल्या पावसाने ...

रोवणीचा धडाका; But no labor was found! | रोवणीचा धडाका; मात्र मजूरच मिळेना !

रोवणीचा धडाका; मात्र मजूरच मिळेना !

शेतकरी पुन्हा हवालदिल : एकमेकांच्या शेतात जाऊन करतात कामे

राजकुमार चुनारकर

चिमूर : मागील काही दिवसांपूर्वी जोर धरलेल्या पावसाने आठवडाभरापासून चांगलीच उसंत घेतली आहे. त्यामुळे चिमूर, नेरी, भिसी, खडसंगी, वाहानगाव, बोथलीसह विविध ठिकाणच्या भागात भात रोवणीच्या कामाला वेग आला आहे. असे असले तरी शेतात काम करण्यासाठी मजूरच मिळत नसल्याने मजुरांची कमतरता भासू लागली आहे. यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल होताना दिसत आहे.

या मजूर कमतरतेचा सामना करत रोवणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात तर केली. मात्र कामांना विलंब होत आहे. दुसरीकडे पावसाने उसंत घेतल्याने अनेक ठिकाणी रोवणी थांबली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने कापूस व सोयाबीन निंदणाचे काम एकाचवेळी सुरू झाले. त्यामुळे मजूर विभागले गेल्याने शेतकऱ्यांना मजुरांची कमतरता भासत आहे. अख्खे कुटुंब शेतात जात असल्याचे पाहून घरातील मुलेही आपला मदतीचा हात देत वडिलांना शेत कामाला मदत करीत आहेत.

यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावल्यानंतर महिनाभर पावसाने चांगली साथ दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेले धान रोपे रोवणी करण्यायोग्य झाली. त्यामुळे भात लागवडीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. भात रोपे खणून त्याची लागवड करण्याचे काम सुरू आहे.

मात्र याही वर्षी शेतमजूर भात रोवणी व निंदणाचे काम करण्यात विभागले गेल्याने मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे भात लागवड करण्याच्या कामात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतावर काम करण्यासाठी मजूर शोधावे लागत आहे. महतप्रयासाने दोन-चार महिला मजूर मिळत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

बॉक्स

मजुरांऐवजी कुटुंबातील सदस्यच कामात

मजूर नसल्याने काही शेतकऱ्यांनी घरातील सदस्य व नातेवाईक यांना सोबत घेऊन शेतातील कामे उरकण्यास सुरुवात केली आहे. तर काही शेतकरी एकमेकांच्या शेतावर अदली-बदलीने जाऊन कामासाठी सहकार्य करीत आहेत. याचबरोबर शाळा बंद असल्याने घरातल्या घरात ऑनलाइन अभ्यासात कसरत करणारी मुलेही वडिलांची शेत कामाची परवड पाहून आपल्या परीने मदत करताना दिसत आहेत.

कोट

जून महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धानाचे पऱ्हे रोवणीसाठी तयार झाले तर दुसरीकडे एक आठवड्यात पावसाने दडी मारल्याने कापूस, सोयाबीनचे निंदणाचे काम एकाच वेळी आले. त्यामुळे उपलब्ध मजूर विभागले गेले. त्याचा फटका मजूर मिळत नसून मजुरीही वाढत आहे.

-प्रशांत कोल्हे, शेतकरी

Web Title: रोवणीचा धडाका; But no labor was found!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.