प्रेमाच्या जाळ्यात ओढून मागितली खंडणी
By Admin | Updated: July 7, 2017 01:07 IST2017-07-07T01:07:28+5:302017-07-07T01:07:28+5:30
घराजवळच राहणाऱ्या १९ वर्षीय युवतीशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एक ते दीड वर्ष त्यांची

प्रेमाच्या जाळ्यात ओढून मागितली खंडणी
पोलिसांनी सापळा रचून केली अटक : युवतीच्या तक्रारीची पोलीस अधीक्षकांकडून तत्काळ दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : घराजवळच राहणाऱ्या १९ वर्षीय युवतीशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एक ते दीड वर्ष त्यांची ही मैत्री बहरली. बाग-बगिच्यात फिरणे, फोटो काढणे सुरू राहिले. त्यानंतर मात्र युवकाने वेगळाच पवित्रा घेतला. काढलेले फोटो हवे असतील व संबंध तोडून दुसऱ्याशी लग्न करायचे असेल तर खंडणी दे, असे म्हणत युवतीला त्रास देणे सुरू केले. अखेर याबाबत युवतीने तक्रार करताच रामनगर पोलिसांनी सापळा रचून या युवकाला अटक केली. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली.
विकास कवडूजी ढोके (२४) रा. म्हाडा कॉलनी चंद्रपूर असे आरोपी युवकाचे नाव आहे. म्हाडा कॉलनीतच आरोपी विकासच्या घराजवळ पीडित युवतीचे घर आहे. त्यामुळे ओळखी होणे स्वाभाविक आहे. तशी दोघांचीही ओळखी झाली. दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. त्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्रीही झाली. एक ते दीड वर्ष दोघांमध्ये चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. यादरम्यान, दोघेही बाग-बगिचात फिरायचे. या मैत्रीचा फायदा घेत विकासने तिच्यासोबत रामाळा तलावात फोटोही काढले. त्यानंतर मात्र विकासने आपला पवित्रा बदलला. सदर युवतीसोबत काढलेले फोटो दाखवून विकास तिला ब्लॅकमेल करू लागला. फोटो हवे असतील व दुसऱ्याशी लग्न करायचे असेल तर पैसे दे, असा तगादा लावत तो तिला त्रास देऊ लागला.
अखेर या त्रासाला कंटाळून पीडित युवतीने पोलिसांकडे तक्रार केली. जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांना भेटून आपबिती सांगितली. पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी याची गांभीर्याने दखल घेत रामनगर पोलिसांना सूचना दिल्या. दरम्यान, आरोपी विकासने पीडित युवती व तिच्या भावाला बुधवारी विद्या निकेतन शाळेजवळ पैसे घेऊन बोलाविले. यादरम्यान, रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोतमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी सापळा रचून त्याला तिथेच पकडले. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी रात्री त्याच्याविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक धनंजय सायरे, राकेश निमगडे, परवेज खान, रुपेश पराते व रामनगर पोलिसांनी केली. पुढील तपास सायरे करीत आहेत.