रानडुकरांकडून आता धानपुजण्यांची नासाडी
By Admin | Updated: December 3, 2015 01:21 IST2015-12-03T01:21:03+5:302015-12-03T01:21:03+5:30
सततच्या नापिकीमुळे आधीच डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

रानडुकरांकडून आता धानपुजण्यांची नासाडी
शेतकरी चिंतेत : रस्ता नसल्याने धान मळणीची कामे खोळंबली
पोंभुर्णा : सततच्या नापिकीमुळे आधीच डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अपुऱ्या सोयीसुविधांमुळे ग्रामीण शेतकरी पुरता हतबल झाला आहे. धानपिकावर अनेक विविध रोगांनी आक्रमण केल्याने काही प्रमाणात तग धरून असलेले पीक हातात आले. मात्र केवळ पांदण रस्ता नसल्याने रामपूर दीक्षित परिसरातील शेतकऱ्यांना धानपिक काढणे कठीण झाले आहे. यामुळे मळणीचे कामे थांबली असून रानटी डुकरांनी शेतात असलेल्या पुजन्यांवर हल्ला चढविला आहे. त्यामुळे धानपिकाची प्रचंड नासाडी होत आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायतीअंतर्गत सन २०११ मध्ये रामपूर दीक्षित येथील शेतशिवारामध्ये अंगणवाडी क्र. ३ ते चिंतामण शिंदे यांच्या शेतापर्यंत ३ कि.मी. अंतराचा पांदण रस्ता ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला. त्यावर मातीकाम करण्यात आले. परंतु सदर रस्ता चार वर्षे लोटून सुद्धा केवळ मध्यभागी अपूर्ण ठेवण्यात आल्याने शासनाच्या लाखो रुपये खर्च केलेल्या निधीचा चुराडा झाला आहे.
परिसरातील शेतकऱ्यांना मात्र या रस्त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना कापणी केलेले धानपिक मळणी करणे अवघड झाले आहे. केवळ रस्त्याअभावी रानटी डुकरांकडून प्रचंड नुकसान सहन करण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे.
सदर अपूर्ण रस्ता पूर्ण करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला आहे. परंतु, या अपूर्ण रस्त्यामागे कुठल्या अडचणी आहेत, हे जाणून घ्यायला स्थानिक अधिकारी व लोकप्रतिनिधींना वेळ नाही. सदर रस्ता पूर्ण झाल्याशिवाय इतर रस्त्याची कामे करण्यात येऊ नये, असे लेखी निवेदन स्थानिक शेतकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे दिले होते.
परंतु संवर्ग विकास अधिकारी लोकरे यांनी संबंधित रस्त्याची पाहणी करून संबंधित प्रकरणात एका शेतकऱ्यांनी वाद घातला असल्याने हा रस्ता वादग्रस्त असून तहसीलदार यांच्याकडे प्रकरण सोपविल्याचे सांगितले. परंतु शेतकऱ्यांना यामुळे किती त्रास सहन करावे लागत आहे, याचे कुणालाच देणे-घेणे नसल्याचे सध्या दिसून येत येत आहे. यात शेतकऱ्यांचेच मोठे नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. (तालुका प्रतिनिधी)