रामपूरवासीयांना मिळाले पाणी
By Admin | Updated: June 2, 2017 00:41 IST2017-06-02T00:41:42+5:302017-06-02T00:41:42+5:30
तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायततंर्गत येत असलेल्या रामपूर दीक्षित येथे पाण्याची भीषण टंचाई होती.

रामपूरवासीयांना मिळाले पाणी
पायपीट थांबली : इंजिनच्या साह्याने पाण्याचा पुरवठा
निळकंठ नैताम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायततंर्गत येत असलेल्या रामपूर दीक्षित येथे पाण्याची भीषण टंचाई होती. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच, प्रशासनाने दखल घेत शेतातील एक कि.मी. अंतरावरील विहिरीचे पाणी रामपूर दीक्षित येथील कोरड्या विहिरीत सोडले. त्यामुळे या विहिरीमध्ये ५ फुट पाणी जमा झाले आहे. त्यामुळे येथील नागरिक व महिलांना दिलासा मिळाला आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या रामपूर दीक्षित गावात भिषण पाणी टंचाई होती. येथील महिला गावालगत असलेल्या एका शेतातील खड्यातील पाण्यावर आपली तहान भागवत होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. सदर वृत्ताने प्रशासनात खळबळ उडाली. त्यामुळे जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पोंभुर्णा येथील पाणी टंचाई संबंधीत आढावा बैठक घेतली. व अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर स्थानिक अधिकारी व पं.स. पोंभुर्णाचे संवर्ग विकास अधिकारी शशीकांत शिंदे व उपसंवर्ग विकास अधिकारी डॉ. उत्कर्ष वाघरे यांनी देवाडा खुर्द येथील सरपंच विलास मोगरकार व ग्रामािवकास अधिकारी दंडारे यांच्या सहकार्याने येथील पाणी विषयक समस्या सोडविण्यासाठी गावाशेजारील विहिरीचे पाणी गावातील विहिरीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर किसन सातरे यांचे शेतातील विहिरीतील पाणी साफ करण्यात आले. मात्र सदर पाणी पिण्यायोग्य नसल्याने गावांपासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या भाऊजी घोंगडे यांचे शेतातील विहिरीतील पाणी साफ करून रामपूर दीक्षित येथे नळयोजनेच्या पाईपला विहिरीतील इंजनचे कनेक्शन जोडले. मात्र पाईल लिकेज असल्यामुळे ते पाणी गावामध्ये पोहचू शकले नाही.
त्यानंतर इंजिनद्वारे साठ ते सत्तर पाईप जोडून थेट रामपूर दीक्षित येथील कोरड्या विहिरीमध्ये पाणी सोडले. त्यामुळे या विहिरीमध्ये आता ५ फुटाचे वर पाणी जमा आहे. गावामध्ये आता पाणी उपलब्ध झाल्याने येथील महिला वर्गाला फार मोठा दिलासा मिळाला आहे.
एप्रिलमध्ये विहिरी कोरड्या
रामपूर दीक्षित येथे दोन हातपंप व एक विहिर आहे. यातील एक हातपंप अनेक महिन्यांपासूनच बंद आहे. तर दुसरे हातपंपातून पाहिजे तसे पाणी मिळत नाही. तर येथील विहिर मार्च-एप्रिल महिन्यातच कोरडी पडत असते. त्यामुळे या गावातील महिला गावालगत असलेल्या दामोधर घोंगडे यांच्या शेतातील खड्ड्यातील पाण्यावर आपली तहान भागवत असतात. ही समस्या या गावात अनेक वर्षांपासून आहे.
भारत निर्माण योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावी
देवाडा खुर्द येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. गावात पाणी टंचाई असताना आठ वर्षांपासून ही योजना कार्यान्वित नाही. मात्र या योजनेसाठी ५४ लाख रुपये खर्च करण्यात आले. तो निधी व्यर्थ गेला काय, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या कामाची वरिष्ठांकडून चौकशी करावी. यातील दोषी असलेले अध्यक्ष व कंत्राटदार तसेच इतर सदस्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.