पंचायत समितीचा कारभार रामभरोसे

By Admin | Updated: May 29, 2014 02:09 IST2014-05-29T02:09:55+5:302014-05-29T02:09:55+5:30

बल्लारपूर पंचायत समितीतील संवर्ग विकास अधिकार्‍यांचा कर्मचार्‍यांवर वचक नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Ram Bharosw of the Panchayat Samiti | पंचायत समितीचा कारभार रामभरोसे

पंचायत समितीचा कारभार रामभरोसे

कोठारी : बल्लारपूर पंचायत समितीतील संवर्ग विकास अधिकार्‍यांचा कर्मचार्‍यांवर वचक नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील कर्मचार्‍यांवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी कारवाई करुन नागरिकांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सध्या पंचायत समिती घरकुलाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तालुक्यात १५0-२00 घरकुल मंजूर झाले आहेत. ५0 ते ६0 घरकुलाचे काम सुरु आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब घरकुलाचा लाभ मिळविण्यासाठी पंचायत समितीचे उंबरडे झिजवत आहेत. घरकुल धारकांना धनादेश वितरीत होत नाहीत. धनादेशासाठी लाभार्थी दररोज पंचायत समितीच्या बीआरजीएफ कार्यालयातील कर्मचार्‍यांकडे चकरा मारत आहेत. मात्र त्यांना धनादेश देण्यास टाळाटाळ करीत आहे. चिरीमीरी देणार्‍यांची त्वरित वर्णी लागत असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.

राजीव गांधी निवारा क्र. २ च्या योजनेचे अनेक प्रस्ताव या कार्यालयात एक वर्षापासून धुळखात पडले आहे. मात्र त्यावर संबंधित कर्मचारी कोणतीही कार्यवाही करीत नाही. पंचायत समितीत १७ ग्रामपंचायती असून यात अनेक गावातील राजीव गांधी घरकुलाचे प्रस्ताव रखडले आहेत. बँकेच्या कर्जाने मंजूर होणारे घरकुल बांधून स्वत:च्या घरात राहण्याची लाभार्थ्यांची इच्छा आहे. यासाठी प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी पंचायत समितीकडे पाठविण्यात आले. सदर प्रस्तावावर संवर्ग विकास अधिकारी व तहसीलदार यांच्या स्वाक्षर्‍या लागतात. मात्र यासाठी महिना- दोन महिने लागतात. तहसिलदार सदर प्रस्तावावर स्वाक्षर्‍या करीत नसल्याने प्रस्ताव रखडल्याचे येथील कर्मचारी सांगत आहेत. मात्र इतर पंचायत समिती, तहसिलमध्ये सदर प्रस्तावावर तहसीलदार त्वरित स्वाक्षर्‍या करुन मंजुरीसाठी पाठवितात. बल्लारपूर तहसिलदारांनी याकडे लक्ष घालून राजीव गांधी घरकुल प्रस्तावावर स्वाक्षर्‍या कराव्या, अशी मागणी होत आहे. पंचायत समिती अंतर्गत असणार्‍या काही सरपंचाणी घरकुल योजनेच्या धनादेशासाठी संबंधित कर्मचार्‍यांकडे आर्थिक लॉबी तयार केली असल्याचे समजते. त्यांचा भ्रमणध्वनी संबंधित कर्मचार्‍यांना येतो व घरकुलाचा धनादेश बनवून तयार मिळतो. यात लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केल्या जात असल्याचा आरोप रमेश पिपरे यांनी केला आहे. घरकुलाच्या धनादेशासाठी लाभार्थी असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी दिलेल्या धनादेशात घरकुलाचे काम सुरु केले किंवा काय, याची तपासणी करुन पुढील धनादेश देण्याचे आदेश असताना अनेक लाभार्थ्यांंनी घरकुलाचे काम न करता धनादेश उचलल्याचे समजते. पंचायत समितीचा कारभार प्रभारी संवर्ग विकास अधिकार्‍यांकडे मागील एक वर्षापासासून आहे. गुरनुले यांची नवृत्ती झाल्यानंतर बाल विकास अधिकारी बल्लारपूर यांच्याकडे प्रभार देण्यात आला.तेव्हा पासूनच पंचायत समितीच्या कारभारात गचाळपणा आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्मचार्‍यांवर त्यांचा वचक नसल्याने कर्मचारी मनमर्जीने वावरतात. त्याचा फटका ग्रामीण नागरिकांना सहन करावा लागत आहे. बांधकाम, कृषी, शिक्षण, आरोग्य, पंचायत, पशुसंवर्धन, सामान्य प्रशासनातील कर्मचारी योग्य काम करीत नसल्याचे पिपरे यांचे म्हणणे आहे. मागील दोन वर्षापासून बचत गटाच्या कामासाठी विस्तार अधिकार्‍यांचे पद निर्माण करण्यात आले. विस्तार अधिकारी बक्षी रुजू झाले. मात्र ते पंचायत समितीत काम करीत नाहीत. जिल्हा परिषदेमध्ये काम करुन पगार मात्र पंचायत समितीच्या आस्थापनेतून घेतात. त्यामुळे बचत गटाच्या महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील समस्या त्वरित सोडवाव्या, अशी मागणी रमेश पिपरे यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Ram Bharosw of the Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.