राखी कंचर्लावार नव्या महापौर

By Admin | Updated: October 30, 2014 22:48 IST2014-10-30T22:48:33+5:302014-10-30T22:48:33+5:30

महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसमधील महापौर गटाच्या मात्र आता भाजपावासी झालेल्या राखी कंचर्लावार यांनी बाजी मारली. काँगे्रसच्या उमेदवार सुनिता लोढीया यांचा ३९ विरूद्ध

Rakhi Kancharlawar New Mayor | राखी कंचर्लावार नव्या महापौर

राखी कंचर्लावार नव्या महापौर

काँग्रेसच्या हाताने चढला भाजपाचा झेंडा : मनपात नव्या राजकीय समीकरणाचे संकेत
चंद्रपूर : महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसमधील महापौर गटाच्या मात्र आता भाजपावासी झालेल्या राखी कंचर्लावार यांनी बाजी मारली. काँगे्रसच्या उमेदवार सुनिता लोढीया यांचा ३९ विरूद्ध २७ मतांनी पराभव करून १२ मतांनी त्या विजयी झाल्या. तर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाचे वसंत देशमुख विजयी झाले.
६६ सदस्यसंख्या असलेल्या मनपाच्या सभागृहातील पक्षीय बलाबल लक्षात घेता काँगे्रसला विजयाची संधी होती. मात्र अंतर्गत गटबाजीने घात केला. दोन दिवसांपूर्वी पक्षाने निवडणूक निरीक्षक पाठवूनही पक्षातील बंडाळी शमविता आली नाही. ही स्थिती कायम राहिल्याने महापौरपदाची निवडणूक काँग्रेस विरूद्ध काँग्रेस अशीच झाली. ऐन वेळी भाजपाने पुढाकार घेत खेळी केली. कंचर्लावार यांनी भाजपात प्रवेश घेतल्याचे सांगितले गेले असले तरी प्रत्यक्षात त्यांनी नामांकन मात्र काँग्रेसच्या नगरसेविका म्हणूनच दाखल केले. यावर काँग्रेसचे नवनियुक्त गटनेते प्रशांत दानव यांनी मतदानापूर्वी सभागृहात आक्षेप घेतला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुनिता लोढीया या असल्याने राखी कंचर्लावार यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर पिठासीन अधिकारी असलेले जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी, न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून ही निवडणूक घेत असल्याचे सांगून मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
दरम्यान, या निवडणुकीसाठी काँग्रेसने व्हिप जारी केला होता. त्याच्या प्रति सभागृहात काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या. मात्र या व्हिपला न जुमानता काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी कंचर्लावार यांना मतदान केले. त्यामुळे या नगरसेवकांवर पक्ष काय कारवाई करणार, हे महत्वाचे आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर शहरातून नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांची विजयी रॅली काढण्यात आली. भाजपाचे झेंडे झळकवित निघालेल्या या रॅलीमध्ये काँग्रेसमधील अनेक राजकीय चेहरेही उपस्थित होते. या निवडणुकीने शहरात नव्या राजकीय समिकरणाचे संकेत दिले आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी राखी कंचर्लावार यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी, भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या १३ जणांच्या नावाची यादी तयार असल्याची चर्चा आज निवडणुकीनंतर जोरात सुरू होती. काँग्रेसच्या नगरसेवकांसह मनपातील नेत्यांचा समावेश या यादीत असल्याचीही जोरात चर्चा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Rakhi Kancharlawar New Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.