राजुरा नगरपालिकेने टाकला दुप्पट करवाढीचा बॉम्ब
By Admin | Updated: November 15, 2015 00:43 IST2015-11-15T00:43:08+5:302015-11-15T00:43:08+5:30
राजुरा नगरपालिकेने करवाढ करताना मालमत्ता कराची दुप्पट करवाढ केल्यामुळे राजुरा शहरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

राजुरा नगरपालिकेने टाकला दुप्पट करवाढीचा बॉम्ब
राजुरा : राजुरा नगरपालिकेने करवाढ करताना मालमत्ता कराची दुप्पट करवाढ केल्यामुळे राजुरा शहरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. ही नियमबाह्य करवाढ असून नागरिकांना लुटण्याचा नगर पालिकेचा डाव आम्ही उधळून लावू, असा इशारा विरोधी पक्षनेता प्रा. अनिल ठाकूरवार यांनी दिला आहे.
नगर पालिकेच्या ठरावानुसार जुन्या मालमत्तेवर १० टक्के करवाढ करावी आणि नवीन बांधकाम असेल तर त्याचे मुल्यांकन करावे, असे असताना जुन्या मालमत्तेवरसुद्धा दुप्पट, अडीच पट करवाढ केल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
नगरपालिकेने केलेल्या कारवाईवर नगर पालिका प्रशासनाच्या व सत्ताधारी अध्यक्षाच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे भरमसाठ कर वाढ करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार नगरपालिका करीत असल्याचा आरोप प्रा. अनिल ठाकुरवार यांनी केला आहे. सर्वेक्षणाच्या काळात गंभीर चुका आहे. नगर पालिका व्यवस्थापन आणि मुख्याधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने करवाढीचा बडगा सामान्य नागरिकांवर पडत असल्याचा आरोप प्रा. अनिल ठाकुरवार यांनी केला आहे.
दरम्यान, राजुरा शहरातील नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोझा पडत असेल तर आम्ही कदापी सहन करणार नाही. रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे सतीश धोटे यांनी आपल्या पत्रकातून म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)