राजेश पोटावीला फसविले
By Admin | Updated: December 18, 2015 01:44 IST2015-12-18T01:44:52+5:302015-12-18T01:44:52+5:30
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११३ बटालियनने धानोरा तालुक्यातील मरकेगाव येथील हरीष उर्फ राजेश उर्फ गोलू पोटावी याला १५ डिसेंबर रोजी अटक केली होती.

राजेश पोटावीला फसविले
मरकेगावच्या ग्रामस्थांचा आरोप : कोणत्याही गुन्ह्यात तो सहभाग नाही
गडचिरोली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११३ बटालियनने धानोरा तालुक्यातील मरकेगाव येथील हरीष उर्फ राजेश उर्फ गोलू पोटावी याला १५ डिसेंबर रोजी अटक केली होती. या घटनेनंतर गुरूवारी मरकेगाव येथील नागरिकांनी लोकमत प्रतिनिधीला भेटून या प्रकरणाची परिस्थिती समजावून सांगितली.
राजेश सावजी पोटावी रा. पोटावी टोला (मरकेगाव) हा कर्करोगी असून तो साधा सरळ युवक आहे. यापूर्वी कोणत्याही नक्षल घटनेमध्ये त्याचा सहभाग नव्हता. दोन दिवस राजेशला सावरगाव पोलीस मदत केंद्रात ठेवून त्याच्याविरूध्द खोटे पुरावे निर्माण करण्यात आले. मरकेगावजवळील पोटावी टोला येथील पोटावी परिवारातीलच राजेशचा काका हरीष पोटावी व मोठा भाऊ गोलू हा नक्षल दलममध्ये कार्यरत आहे. मात्र राजेश नक्षली नसतांनाही चामोर्शी एलओसी दलम सदस्यास अटक केल्याचे वर्तमानपत्रातून पोलिसांना कळाले. यात राजेश पोटावीचे छायाचित्रही आहे. राजेशचा कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नसताना त्याच्याविरूध्द खोटे पुरावे निर्माण करण्यात आले आहे. याबाबत सावरगाव पोलिसांनी राजेशची सुटका करावी, अशी मागणी येथील नागरिक बारसाय पोथा, पंडिराम उसेंडी, देवाजी नैताम, बुधेसिंग नैताम, मनकूराम पुडो, देवसाय उसेंडी, मनुराम धुर्वे, परशु पोटावी, कमलेश पोया, सावजी पोटावी, मोतीराम पोटावी, मनकेर उसेंडी या ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना केली आहे. (प्रतिनिधी)