मुद्रा बँक योजनेची जनजागृती करा
By Admin | Updated: August 24, 2016 00:34 IST2016-08-24T00:34:26+5:302016-08-24T00:34:26+5:30
सुशिक्षित बेरोजगांरासह उद्योजक होण्याची आशा बाळगून असलेल्या हजारो व्यक्तींच्या हाताला हक्काचा स्वयंरोजगार ...

मुद्रा बँक योजनेची जनजागृती करा
आशुतोष सलील : मुद्रा बँक समन्वय समितीची बैठक
चंद्रपूर : सुशिक्षित बेरोजगांरासह उद्योजक होण्याची आशा बाळगून असलेल्या हजारो व्यक्तींच्या हाताला हक्काचा स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी मुद्रा बँक योजना सुरु करण्यात आली आहे. या बँकेचा अधिकाधिक युवकांना फायदा होण्यासाठी या योजनेची व्यापक जनजागृती करा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिले.
जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीची पहिली बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली, त्यावेळी ते बोलत. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यासह जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जुनोनकर, अग्रणी बँकेचे रामटेके व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रमोद घटे आदी उपस्थित होते.
युवकांना कर्जाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधानांनी मुद्रा बँक योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. सर्व राष्ट्रीयकृत बॅकांच्यावतीने कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार करुन अधिकाधिक युवकांपर्यंत योजना पोहचविणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृतीवर करुन जनसामान्यापर्यंत ही योजना पोहचविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
उद्योजक होवू इच्छिणाऱ्या युवकांसाठी मेळावे, चर्चा सत्र घेण्याची सुचना त्यांनी यावेळी केली. यासोबतच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणारे तसेच प्रशिक्षण घेवून बाहेर पडलेल्या उमेदवारांसाठीही प्रशिक्षण आयोजित करण्याची सुचना त्यांनी केली. यशस्वी उद्योजक म्हणून कारकिर्द घडविलेल्या उद्योजकांच्या यशोगाथा व त्यांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्याचा सल्ला दिला. (प्रतिनिधी)