बरसत्या पावसात भक्तीचा पूर
By Admin | Updated: September 18, 2015 00:58 IST2015-09-18T00:58:57+5:302015-09-18T00:58:57+5:30
मनपाच्या ढिसाळ कारभाराचा फटका गुरूवारी पुन्हा एकदा चंद्रपूरकरांना बसला. अगदी गणेश चतुर्थीच्या दिवशी पाऊस धो-धो बरसला.

बरसत्या पावसात भक्तीचा पूर
चंद्रपूर : मनपाच्या ढिसाळ कारभाराचा फटका गुरूवारी पुन्हा एकदा चंद्रपूरकरांना बसला. अगदी गणेश चतुर्थीच्या दिवशी पाऊस धो-धो बरसला. यामुळे आझाद बागेजवळचा मार्ग नेहमीप्रमाणे पाण्याखाली गेला. नेमक्या याच मार्गावर मूर्तीच्या विक्रीसाठी दुकाने लागल्याने पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढत नागरिकांना मूर्तीसह पाण्यातून वाट काढावी लागली.
काल सायंकाळपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्री थोडी उसंत घेतल्यावर पुन्हा पाऊस आला. यामुळे शहरातील बंद पडणारे मार्ग नेहमीप्रमाणेच पाण्याखाली आले. कस्तुरबा मार्गावरील छोटा बाजार परिसरात कुंभार ओळ असल्याने या ठिकाणी दरवर्षीच गणेश चतुर्थीच्या दिवशी तोबा गर्दी असते. छोटा बाजार ते श्रीकृष्ण टॉकीज चौकापर्यंतचा परिसर गर्दीने फुललेला असतो. आझाद बागेजवळ गणेशमूर्तीच्या विक्रीसाठी स्टॉल लागले आहेत. बुधवारपासूनच या ठिकाणी मूर्तींची विक्री सुरू झाली होती. मूर्तीसोबतच पूजा साहित्य, मखरांची दुकाने सजलेली असतात. या ठिकाणी सकाळपासूनच गर्दी सुरू झाली असली तरी हा मार्ग मात्र पहाटेपासूनच पाण्याखाली होता. मूर्तीकारांना पावसाच्या पाण्याचा आधी प्लास्टिकच्या छतातून गळणाऱ्या पावसाच्या धारांपासून बचाव करीत मूर्तीची विक्री करावी लागली.
आझाद बागेपासून या मार्गावर पूर्णत: पाण्याचा प्रवाह असल्याने अनेकांची फजिती झाली. पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढत आणि दोन्ही हातांमध्ये मूर्ती सांभाळत अनेकांना वाट काढावी लागली. खरेदीसाठी महिलांची आणि लहान मुलांचीही मोठी गर्दी होती. वरून पाऊस बरसत असतानाही अनेकांनी छत्री, प्लॉस्टीकचा आडोसा करीत मूर्ती सांभाळत घरी नेल्या. या पार्श्वभूमीवर आॅटोचेही भाव गुरूवारी रोजच्यापेक्षा तडकलेले दिसले. स्थापनेचा मुहूर्त टळायला नको म्हणत अनेकांनी जोखीम पत्करत मूर्ती आपल्या दुचाकीवरूनच नेल्या. काहींनी आॅटोचा आधार घेतला. पावसाचे पाणी कस्तुरबा मार्गावर सुमारे दीड-दोन फूट असल्याने अनेक वाहने अडकून पडली. याचा परिणाम खरेदीविक्रीच्या व्यवहारावरही झाला. दुपारी पाणी ओसरल्यावर मार्ग आणि व्यवहार पुन्हा वेगाने सुरू झालेले दिसले. असे असले तरी नागरिकांच्या उत्साहात कसलीही कमतरता दिसत नव्हती. बरसत्या पावसावर आणि रस्त्यावरच्या पाण्यावर मात करीत अनेकांनी आपले व्यवहार उरकले. अनेकजण सहकुटूंब खरेदीसाठी आले होते. बऱ्याच कालावधीनंतर आलेल्या पावसावर जराही राग न काढता अनेकांनी पावसातही खरेदीचा आनंद लुटला. (जिल्हा प्रतिनिधी)