‘एन्ट्री’ करून पाऊस गायब
By Admin | Updated: June 26, 2016 00:37 IST2016-06-26T00:37:39+5:302016-06-26T00:37:39+5:30
यावर्षी खरीप हंगाम आणि निसर्ग शेतकऱ्यांची परीक्षा पाहत आहे. प्रारंभी मान्सून येईल, भरपूर पाऊस पडेल,

‘एन्ट्री’ करून पाऊस गायब
अस्मानी संकट : शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडे
चंद्रपूर : यावर्षी खरीप हंगाम आणि निसर्ग शेतकऱ्यांची परीक्षा पाहत आहे. प्रारंभी मान्सून येईल, भरपूर पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा दाखविण्यात आली. मात्र वेळ निघून गेल्यानंतरहही मान्सून आला नाही. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले. आतातरी पाऊस नियमित येईल, अशी आशा वाटली. मात्र पाऊस एन्ट्री करून अचानक गायब झाला. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले आहेत.
गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तो कर्जबाजारी झाला. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी पूर्णत: खचून गेला होता. शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र पैसेवारीत जिल्हा पात्र ठरला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक छदामही मदत मिळाली नाही. मागील दोन वर्षांचे झालेले नुकसान विसरून बळीराजा पुन्हा खरिपाच्या तयारीला लागला आहे. शेतातील अनावश्यक कचरा स्वच्छ करण्यात आला आहे. शेणखत टाकण्यात आले आहे. आवश्यक त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कुंपणाचीही आतापासूनच व्यवस्था करून ठेवलीे आहे.
नांगरणी-वखरणीची कामेही सुरू असून तीसुध्दा अंतिम टप्प्यात आहे. इकडे कृषी विभागानेही खरीप हंगामाचे नियोजन करून ठेवले आहे. यंदा कृषी विभागाने ४ लाख ६७ हजार ६८२ हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यात साधारणत: कापूस, सोयाबीन व धान या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ७७ हजार ६८ हेक्टरवर धानाची लागवड होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यापाठोपाठ कापूस १ लाख ३४ हजार ८२७ हेक्टर व सर्वात कमी सोयाबीन १ लाख १८ हजार हेक्टर, असे लागवड क्षेत्र आहे. मागील वर्षी कापसाने दगा दिल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंत दर्शविली होती.
मात्र यावेळी नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसाची लागवड वाढणार आहे, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. बियाणे व खतांचे आवंटन मंजूर करून घेतले आहे. यावर्षी खरीप हंगामात भात, ज्वारी, तृणधान्य, तूर, मूग, उडीद, कडधान्य, अन्नधान्य, भुईमुंग, तीळ, सोयाबीन, एरंडी, गळीत धान्य, कापूस, ऊस पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
ऐनवेळी शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये, यासाठी कृषी विभागाने खते मागविली आहेत. खताची एक खेप जिल्ह्यात उपलब्धही झाल्याची माहिती आहे.
(शहर प्रतिनिधी)
एकूणच हंगामपूर्वीची सर्व कामे आता आटोपली आहेत. आता बळीराजा केवळ पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूरसह दोन, चार तालुक्यात हा पाऊस तासभर बरसत राहिला. यामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचले. मात्र ते तात्पुरत्या स्वरुपात साचले होते. जमीन एवढी गरम होती की काही तासातच शेतातील पाणी सुकले. तरीही एकदाचा मान्सून आला; आता नियमित पावसाची रिपरिप सुरू राहील, अशी आशा शेतकऱ्यांना वाटायला लागली. मात्र त्यानंतर पुढे पाऊस अचानक गायब झाला आणि कडाक्याचे ऊन्ह पडू लागले. या उन्हामुळे पुन्हा अनेक समस्या निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा आभाळाकडे लागल्या आहेत.