आंदोलनाच्या इशाऱ्याने रेल्वे प्रशासनाने निर्णय बदलविला
By Admin | Updated: November 6, 2014 22:52 IST2014-11-06T22:52:57+5:302014-11-06T22:52:57+5:30
मध्ये रेल्वेच्या वरोरा विभागात नाईट पेट्रोलिंगसाठी पाठवित असलेल्या दोन गँगमन ऐवजी एक गँगमन पाठविण्यात येणार असल्याचे आदेश प्रशासनाने दिले. रात्री एकाच गस्तीत दोन गँगमन पाहिजे,

आंदोलनाच्या इशाऱ्याने रेल्वे प्रशासनाने निर्णय बदलविला
अधिकाऱ्यांची धावपळ : दोनऐवजी एकच गँगमनची ड्युटी
वरोरा : मध्ये रेल्वेच्या वरोरा विभागात नाईट पेट्रोलिंगसाठी पाठवित असलेल्या दोन गँगमन ऐवजी एक गँगमन पाठविण्यात येणार असल्याचे आदेश प्रशासनाने दिले. रात्री एकाच गस्तीत दोन गँगमन पाहिजे, या मागणीकरिता नॅशनल रेल्वे मजदूर युनियन शाखा वरोराच्यावतीने रेल रोको आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनास दिला. संघटनेचे सदस्य संघटनेच्या कार्यालयात गोळा होवू लागले. त्यामुळे वातावरण तापत असताना रेल्वे प्रशासनाची झोप उडाली. तो आदेश अवघ्या काही तासात रद्द करुन रात्रपाळीत दोन गँगमन पाठविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यामुळे रेल रोको आंदोलन स्थगित झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
गँगमन रात्रपाळीत रात्री ११ ते सकाळी सात वाजेपर्यंत चार किलोमिटरपर्यंतच्या रेल्वे ट्रॅकची देखभाल करतात. रात्रीच्यावेळी ही देखभाल करीत असताना एकावर रानडुकराने हल्ला केला. एकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने तर एक गँगमन रेल्वे ट्रॅकमध्ये पाय अडकल्याने जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशा घटना वारंवार घडत असल्याने रात्रपाळीत दोन गँगमनची ड्युटी लावण्यात येत असताना वरोरा येथील रेल्वे प्रशासनाने त्याची संख्या एकवर आणली असल्याची माहिती नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
यासोबत ३१ रेल्वे कर्मचारी रेल्वे अधिकाऱ्यांच्या घरी खासगी कामावर ठेवल्याने रात्रपाळीत दोन गँगमन दिले जात नसल्याचा आरोप वरोरा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी करीत त्यांच्याकडून प्रत्येक महिन्याला रक्कमही घेतली जात असल्याची माहिती दिली. त्यामुळे रात्रपाळीत एकच गँगमन पाठविण्यात येत आहे. अशी माहिती युनियनच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी रात्रपाळीत दोन गँगमन देण्यात यावे, याकरिता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देत रेल्वे रोको करण्याचा इशाराही ४ नोव्हेंबर रोजी दिला. रात्री सात वाजता वरोरा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको करण्यासाठी युनियनच्या कार्यालयात सदस्य गोळा झाले. निर्णय मागे घेण्यात आला. परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे खासगी कामाकरिता असलेल्या ३१ कर्मचाऱ्यांना आपल्या पूर्ववत कामावर परत घेण्याकरिता १८ नोव्हेंबरपर्यंत नॅशनल रेल्वे मजदूर युनियच्या पदाधिकाऱ्यांनी वेळ दिला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये नॅशनल रेल्वे मजदूर युनियन शाखा वरोराचे अध्यक्ष विनोद लभाने, सचिव नितीन काकडे, कोषाध्यक्ष रामदास वांढरे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)