पाणी पुरवठ्यावरून आमसभेत गदारोळ

By Admin | Updated: December 19, 2015 00:43 IST2015-12-19T00:43:53+5:302015-12-19T00:43:53+5:30

चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा मागील अनेक महिन्यांपासून कोलमडला आहे. याबाबत नागरिकांचा नगरसेवकांवर रोष व्यक्त होत आहे.

Rage in the Aam Aadmi Party | पाणी पुरवठ्यावरून आमसभेत गदारोळ

पाणी पुरवठ्यावरून आमसभेत गदारोळ

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा मागील अनेक महिन्यांपासून कोलमडला आहे. याबाबत नागरिकांचा नगरसेवकांवर रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे आज शुक्रवारच्या महापालिकेच्या आमसभेत नगरसेवकांनी याबाबत संताप व्यक्त करून चांगलाच गदारोळ घातला. वारंवार सूचना देऊनही उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनी पाणी पुरवठा वितरणाच्या कामात सुधारणा करीत नसल्याने मनपा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा निर्णय आजच्या आमसभेत घेतला.
चंद्रपूर शहरात मागील अनेक महिन्यांपासून पाणी पुरवठा सुरूळीत होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनेक भागात नळाला पाणीच येत नाही. काही ठिकाणी पाणी आले तर ते केवळ अर्धा-एक तासच येते. अशातच नळाची धारही मोठी नसते. त्यामुळे नागरिकांना इरई धरणात पाणीसाठा असताना व घरी नळ असतानाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
विशेष म्हणजे, पाणी पुरवठा करणाऱ्या उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीने नागरिकांना कोणतीही सूचना न देता पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल केला. याबाबतही नागरिकांच्या तक्रारी आहेत. याचा जाब अनेक वॉर्डातील नागरिकांनी नगरसेवकांना विचारला व आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे नगरसेवकही संतापलेले होते. हा संताप आजच्या आमसभेत निघाला. नगरसेवक प्रविण पडवेकर, नंदू नागरकर, संजय वैद्य यांच्यासह बहुतेक नगरसेवकांनी पाणी पुरवठ्याचे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली. नगरसेवक राजकुमार ऊके यांनी तर तक्रारी असतानाही त्या कंत्राटदाराकडे अजूनही कंत्राट का ठेवण्यात आले आहे, असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे आमसभेत चांगलाच गदारोळ झाला.
कोलमडलेल्या पाणी पुरवठ्याबाबत आयुक्तांना जाब विचारण्यात आला. त्यानंतर महानगरपालिकेने याबाबत संबंधित कंत्राटदाराला अनेकदा सूचित केले असून कारणे दाखवा नोटीस व दंडात्मक कारवाईही केल्याचे सांगितले. मात्र नगरसेवकांचे समाधान होत नसल्याने पाणी पुरवठ्याबाबत कडक पाऊल उचलण्याचे निश्चित झाले.
यापुढे म्हणजे १ जानेवारी २०१६ पासून नागरिकांनी पाणी पट्टी कर महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात भरावे. उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे त्याचा भरणा करू नये, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून केले जाणार आहे. त्यानंतर या कंत्राटासाठी पुन्हा नव्याने निविदा मागविण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी सभागृहात दिली. विशेष म्हणजे, संबंधित कंत्राटदार न्यायालयात जाणार असे गृहित धरून मनपाने आधीच कॅवेट दाखल केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
त्यानंतर जागा आरक्षणाचा विषय चर्चेला आला. वडगाव येथील विजय आर्इंचवार यांची जागा आहे. मात्र ही जागा मनपाच्या दवाखान्यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे या जागेवरील आरक्षण काढावे किंवा जागेची किमत देऊन जागा मनपाने ताब्यात घ्यावी, या आशयाचे पत्र आर्इंचवार यांनी मनपाला दिले आहे. याबाबत सभागृहात चर्चा झाल्यानंतर सदर जागा ६२ लाख रुपये देऊन दवाखान्यासाठीच आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
बाबुपेठ परिसरात स्टेडीयम तयार करण्याचा प्रस्ताव महापौर राखी कंचर्लावार यांनी मांडला. क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Rage in the Aam Aadmi Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.