आरोग्य सेवा शासनाच्या रडारवर
By Admin | Updated: March 21, 2015 01:31 IST2015-03-21T01:31:16+5:302015-03-21T01:31:16+5:30
ग्रामीण नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पुरविण्यात शासकीय आरोग्य संस्थाचा मोठा वाटा आहे. मात्र या

आरोग्य सेवा शासनाच्या रडारवर
शासनाची कायापालट योजना : प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर नोडल अधिकारी ठेवणार लक्ष
चंद्रपूर : ग्रामीण नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पुरविण्यात शासकीय आरोग्य संस्थाचा मोठा वाटा आहे. मात्र या संस्थाची दुरवस्था झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय आरोग्य संस्था स्वच्छ, सुसज्ज व लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने ‘कायापालट योजना’ सुरू केली. या योजनेद्वारे प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर आता नोडल अधिकारी लक्ष ठेवणार आहे.
काही शासकीय आरोग्य संस्थामध्ये अनाधिकृतरीत्या वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात. त्यामुळे तेथील आरोग्य सेवेवर अनिष्ट परिणाम पडतात. औषध साठा राहत नाही. अशावेळी रूग्णांची गैरसोय होते. त्यामुळे औषधसाठा पुरेशा प्रमाणात ठेऊन आवश्कतेनुसार त्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे. आरोग्य संस्थाचे सुशोभिकरण व बळकटीकरण करून जनतेला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने कायापालट योजना असून प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा नोडल अधिकारी नियुक्त करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याने त्यांच्या मूळ पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडून संबंधित जिल्ह्याला वेळोवेळी भेटी देणे आवश्यक राहणार आहे. संबंधित जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करून आरोग्य सेवा सुधारण्यासाठी समन्वय साधणे हे त्यांचे काम राहणार आहे. तसेच संबंधित जिल्ह्यातील आरोग्य विषयक वृत्तपत्र, वाहिन्यांद्वारे येणाऱ्या बातम्यांची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करणे, संबधीत वृत्तसंस्थेस खुलासा करण्याची व्यवस्था करणे, संबंधित जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्याची जबाबदारी नोडल अधिकाऱ्याला पार पाडावी लागणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
सुरेश तांबे जिल्ह्याचे नोडल अधिकारी
४चंद्रपूर जिल्ह्याचे नोडल अधिकारी म्हणून डॉ. सुरेश तांबे यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. डॉ. तांबे हे पुणे येथे (कुटुंब कल्याण विस्तार, जाहिरात व प्रसिद्धी) उपसंचालक आहेत. त्यांच्या देखरेखीत जिल्ह्यातील आरोग्यसेवा चालणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना आरोग्यसेवेसाठी होत हेळसांड दूर होईल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.