रबीनेही सोडली शेतकऱ्यांची साथ

By Admin | Updated: March 9, 2015 01:28 IST2015-03-09T01:28:32+5:302015-03-09T01:28:32+5:30

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेती व्यवसायाकडे बघितले जाते. मात्र निसर्गाने साथ

Rabina also left with the farmers | रबीनेही सोडली शेतकऱ्यांची साथ

रबीनेही सोडली शेतकऱ्यांची साथ

उत्पादनखर्चही भरून निघेना ! : खरिपानंतर आता रबीचे उत्पादन घटण्याची शक्यता
नांदाफाटा
: देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेती व्यवसायाकडे बघितले जाते. मात्र निसर्गाने साथ सोडली तर हा कणा कसा मोडून जातो, याचे चित्र सध्या जिल्ह्यात सर्वत्र दिसत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने कलाटनी दिल्याने शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीचा सामना करावा लागला. त्यानंतर आता रबीतही गहू, हरभरा, मिरची आदी पिकांचे उत्पादन घटत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे खरिपानंतर आता रबीची आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येऊ पाहत आहे.
खरीप हंगामात पाऊस न पडल्याने कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांचे उत्पादन कमालीचे घटले. त्यानंतर साधा उत्पादन खर्चही भरुन निघाला नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यानंतर एक हंगाम उत्पादनाविनाच गेला व रब्बीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली. यात गहू, हरभरा, तूर, ज्वारी आदी पिकांची पेरणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाली. सुमारे दीड लाखाहून अधिक हेक्टरवर रबीचा पेरा होता. मात्र पावसाचे प्रमाण अधिक नसल्याने ओलिताखालील शेतजमिनींनाही पाणी देण्यास शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी पाहिजे त्या प्रमाणात रब्बी पिकांना पाण्याचा पुरवठा झाला नाही. दुसरीकडे रब्बी पिके निघत असताना नुकताच अवकाळी पाऊस झाला. यात फळधारणेवर असलेला गहू- हरभरा आणि मिरची पिकांचे नुकसान अनेक तालुक्यात झाले आहे. अशातच आता तूर, हरभरा, गहू, मिरची आदी पिके निघत असताना या पिकांची उतारी घटत चाललेली दिसते. एकरी खर्च करण्यात आलेला उत्पादन खर्चही भरुन निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. खरिपाचे पिक हातून गेल्याने त्या तुलनेत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या उत्पादनासाठी महागडी बियाणे, खते, औषधी व आधुनिक पद्धतीने शेतीतंत्रज्ञानाचा उपयोगही केलेला दिसतो. परंतु काही तालुक्यात सिंचनाची सुविधा नसल्याने तर कुठे अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.
शेतकऱ्यांना प्रामुख्याने खरिपानंतर रब्बी पिकाची मोठी आशा असते. खरिपाच्या उत्पादनात सावकार आणि बँकाचे कर्ज फेडून दिवाळी साजरी करायची तर रब्बी पिकात मुलीचे लग्न व उर्वरित कर्ज फेडायचे असे शेतकऱ्यांचे सर्वसामान्य गणित असते. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून कधी पुराने आणि पावसाने तर कधी पाऊसच नसल्याने शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे. खरिपातील बियाण्याची उधारी ठेवूनच साधी शेतकऱ्यांनी रब्बीची बियाणे खरेदी केली. परंतु उतारी घटत असलेली दिसत असून शेतकऱ्यांना मुलभूत गरजा भागविताना मोठे कष्ट करावे लागत आहे.
रब्बी हंगामात साधारणत: तूर, हरभरा, गहू, ज्वारी विकून शेतकरी पुढच्या खरिपाची तयारी करतो. परंतु यावर्षी रब्बीचे उत्पादन कमी दिसत असल्याने पुढील शेती कशी करावी, असा प्रश्न आतापासूनच शेतकऱ्यांपुढे आवासून उभा दिसत आहे. यातच शासनाने पुरग्रस्त व अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. यासाठी सर्वेक्षण करुन यादी प्रकाशित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्यापही याचा लाभ मिळालेला नाही. खरीप आणि रब्बीतही हाती दमडी येत नसल्याने शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊ म्हणणारे शासनही दिलासा देण्याऐवजी शेतकरीविरोधी कायदे अमलात आणत आहेत. (वार्ताहर)

नवीन वर्षात नवीन संकट
ठेक्याने शेती द्यायच्या मानसिकतेत शेतकरी
स्वत:ची शेतजमीन स्वत: कसून पिढ्यानपिढ्या शेती करीत असलेला शेतकरी आता कमालीचा हतबल झाला आहे. बियाणे, खते व कीटकनाशके, मजुरांचे वाढलेले भाव व शासनाची उदासीनता शेती व्यवसायास मारक ठरत आहे. आधुनिक शेतीचा मार्ग धरुन काही शेतकरी मोठे उत्पादन घेत आहे. परंतु बाजारात शेतमाला किंमत मिळत नसल्याने उत्पादन खर्च भरुन निघणे अशक्य होत आहे. त्यामुळे अनेक वर्ष स्वत: कसलेली शेती ठेक्याने देण्याच्या मानसिकतेतही शेतकरी दिसत आहे.
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शेतकऱ्यांच्या नवीन वर्षास सुरुवात होते. यादिवशी नवीन गडीमाणूस ठेवला जातो किंवा जुन्याच माणसाला नवीन वाढ देऊन ठेवले जाते. यात १२ महिन्याचे साल म्हणून पैशे व धान्य देण्यात येते. यावेळी घरातील लग्न, घरबांधकाम, सार्वजनिक, कौटुंबिक कार्यक्रम आदींसाठी गडीमाणसे शेतकऱ्यांना नगदी रकमेची अडवॉन्सची मागणी करतात. या दोन-तीन वर्षात १० ते १५ हजार रुपये अडवॉन्स म्हणून मागितली जात आहे. तर एका गडीमाणसासाठी वर्षाचे ६० ते ७० कुठे ८० हजारापर्यंत साल दिले जाते. गेल्या वर्षीही शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पादन झाले नाही. तरी आर्थिक अडचण सहन करीत शेतकऱ्यांनी १५ ते २० दिवसाच्या मुहुर्तावर गडीमाणसाचा अडवॉन्स दिला. मात्र यावर्षी खरीप आणि आता रब्बीतही उत्पादनात घट आल्याने या पैशाची तडजोड कशी करावी, गडीमाणसाच्या सालाचे पैशे कुठून आणावे, हा प्रश्न आहे. राबराब राबून शेतीत स्वत:च्या कुटुंबाचा गाढा चालविणे अशक्य होत असताना गडीमाणसाचे पैसे कुठून जमा करावे या विवंचनेत शेतकरी सध्या दिसत आहे.

Web Title: Rabina also left with the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.