सव्वा लाख हेक्टरवर रबी पेरणी

By Admin | Updated: October 31, 2015 01:56 IST2015-10-31T01:56:20+5:302015-10-31T01:56:20+5:30

यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना खरीप हंगामात बसला असून रबी हंगामावर आता शेतकऱ्यांच्या नजरा आहेत.

Rabi sowing on 1.2 lakh hectare | सव्वा लाख हेक्टरवर रबी पेरणी

सव्वा लाख हेक्टरवर रबी पेरणी

खरीप हंगामातील अपयश पुसणार : शेतकऱ्यांची लगबग सुरू
चंद्रपूर : यावर्षीच्या अत्यल्प पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना खरीप हंगामात बसला असून रबी हंगामावर आता शेतकऱ्यांच्या नजरा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच लगबग सुरू केली असून यावर्षी अनेकांची जमीन खरीप हंगामात पडिक राहिल्याने रबीचा पेरा वाढणार आहे. जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाच्या आराखड्यानुसार यावर्षी जवळपास सव्वा लाख हेक्टरवर रबी पीक पेरणी होणार आहे.
यावर्षी खरीप हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. तर ज्यांनी केली त्यांची पिकेही शेवटच्या पाण्यासाठी अखेरची घटका मोजत आहेत. त्यामुळे खरीप हंगामात यावर्षी उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.
खरीप हंगाम हातातून गेला असला तरी रबी हंगामात पेरणी करून खरिपात झालेले कर्ज फेडण्याचे अनेक शेतकरी विचार करीत आहेत. त्यामुळे धान, सोयाबीन, कापूस आदी पिके अंतिम टप्प्यात असून रबी पीक पेरणीसाठी बियाणे जुळवाजुळव शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.
ज्या शेतकऱ्यांचे खरीप हंगामात पावसाअभावी पीक करपून गेले किंवा पेरणी करता आली नाही, अशा शेतकऱ्यांची जमिन आधीच पडीत असल्याने आतापासून रबी पेरणीला सुरूवात केली आहे. हरभरा, ज्वारी, गहू, मका, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात.
या पिकांची शेतकऱ्यांना पेरणी करता यावी यासाठी शेतकऱ्यांनी बियाणांची जुळवाजुळव सुरू केली असून कृषी विभागानेही शासनाकडे बियाणांची मागणी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

वरोरा उपविभागात सर्वाधिक क्षेत्र
रबी हंगामात सर्वाधिक पेरणी वरोरा उपविभागात होणार आहे. वरोरा उपविभागात वरोरा, भद्रावती, चिमूर या तालुक्यांचा समावेश आहे. या उपविभागात ५२ हजार ६९० हेक्टर क्षेत्रावर रबी पीक पेरणीचे नियोजन असून आतापर्यंत १०१५ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. यात वरोरा तालुक्यात ४६० हेक्टर, भद्रावती १९५ हेक्टर तर चिमूर तालुक्यात ३६० हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे.

गहू आणि हरभरा पिकाला अधिक पसंती
रबी हंगामात ज्वारी, तिळ, मका, लाखोळी व इतर कडधान्याची पेरणी होत असली तरी शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती गहू आणि हरभरा पिकाला आहे. गहू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३२ हजार ४० असून हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३१ हजार ९८० हेक्टर आहे. यात आतापर्यंत गहू पीक ४९ हेक्टरवर तर हरभरा पिकाची १ हजार २२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Web Title: Rabi sowing on 1.2 lakh hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.