नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी त्वरित नियोजन करा
By Admin | Updated: November 24, 2014 22:55 IST2014-11-24T22:55:37+5:302014-11-24T22:55:37+5:30
नरभक्षक प्राण्यांचा मानवावर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे नागरिक व शेतकरी भयभित झाले आहे. पिकांची राखण करण्याचे त्यांनी सोडून दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील

नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी त्वरित नियोजन करा
चंद्रपूर : नरभक्षक प्राण्यांचा मानवावर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे नागरिक व शेतकरी भयभित झाले आहे. पिकांची राखण करण्याचे त्यांनी सोडून दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकेसुद्धा वन्यप्राणी फस्त करीत आहेत. अशा कठीण प्रसंगी वनविभागाने या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी नियोजन करुन तातडीने उपाययोजना कराव्या, असे निर्देश ना. सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील पद्मा मडावी या महिलेवर वाघाने हल्ला करुन २० नोव्हेंबर रोजी ठार मारले. त्या महिलेच्या कुटुंबियाना भेट देवून सांत्वना करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतकांच्या वारसदारांना पाच लाख रुपयाऐवजी आठ लाख रुपये मदत शासनातर्फे देण्यात येणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
मृत महिलेच्या कुटुंबियांना वनविभागातर्फे देण्यात येणाऱ्या मदत रक्कमेतील ७५ हजार रुपयांना धनादेश ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, चिंतलधाबा येथील सरपंच मंगला कुळमेथे, तहसीलदार राजेश सरोदे, मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हीरे, विभागीय वनअधिकारी आर. टी. धाबेकर, कोठारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, जिल्हा परिषद सदस्य संदीप करपे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुंभरे आदी उपस्थित होते.
पोंभुर्णा तालुक्यातील जंगल परिसरात असलेल्या गावातील नागरिक जळावू लाकडे व इतर साहित्य आणण्यासाठी जंगलात वारंवार जातात. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. या भागातील नागरिक जंगलात जाणार नाही यावर प्रतिबंध घालण्यासाठी या भागातील गावातील सर्व नागरिकांना तातडीने गॅसचे वाटप करण्यात यावे. तसेच या गावातील नागरिकांना जळावू बिटे जुन्या दराने विकत द्यावे, असे निर्देशही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी संबंधित विभागाला दिले. यावेळी उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी या वाघाला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले असून वनविभागार्फे नियमित गस्त घालण्यात येत असल्याची माहिती दिली. यावेळी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)