भोजनावळीतून सुटला रुग्णांच्या नातेवाइकांच्या जेवणाचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:29 IST2021-05-06T04:29:37+5:302021-05-06T04:29:37+5:30
फोटो : जेवणाचे डबे वितरित करताना कार्यकर्ते. चंद्रपूर : कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे उपचारासाठी रुग्ण रुग्णालयात दाखल ...

भोजनावळीतून सुटला रुग्णांच्या नातेवाइकांच्या जेवणाचा प्रश्न
फोटो : जेवणाचे डबे वितरित करताना कार्यकर्ते.
चंद्रपूर : कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे उपचारासाठी रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत; मात्र काळजी घेण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांचे लाॅकडाऊन असल्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. हे लक्षात घेता शहरातील सामाजिक कार्य करण्यासाठी सातत्याने धडपडणाऱ्या काही युवकांनी
एकत्र येत रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाचे डबे देण्याचा उपक्रम सुरू केला. यासाठी एक-एक करीत अनेकांनी मदतीचा हात दिला असून, यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. सद्यस्थितीत रुग्णसंख्या १६ हजारावर पोहोचली आहे. त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. परिणामी, खानावळ, रेस्टाॅरंट बंद आहेत. जे सुरू आहेत, त्यासाठी वेळ निश्चित आहे. अशा स्थितीत रुग्णांची काळजी घेण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांचे मोठे हाल होत आहेत. विशेष म्हणजे, चंद्रपूर येथे जिल्हाभरासह शेजारी असलेल्या यवतमाळ, गडचिरोली तसेच तेलंगणातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे प्रत्येकांनाच अडचणीचा सामना करावा लागत आहे. जेवणाचा प्रश्न लक्षात घेता येथील सामाजिक कार्यकर्तेे प्रशांत आर्वे, प्रा. विजय बदखल, डाॅ. चेतन खुटेमाटे, तहसीलदार संतोष खांडरे यांनी रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाचे डबे पुरविण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी त्वरित अंमलबजावणी सुरू केली. बघता बघता यासाठी अनेकांनी मदतीचा हात समोर केला असून, मागील काही दिवसांपासून दररोज शासकीय कोविड सेंटरमध्ये जेवणाचे डबे दिले जात आहेत. या उपक्रमामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला असून, या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
बाॅक्स
दर दिवशी १५० डब्बे
रुग्णालय परिसरामध्ये एक स्टाॅल लावण्यात आला आहे. या स्टाॅलमधून दरदिवशी १५० च्यावर डब्बे दिले जात आहेत. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे.
कोट
रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासन रुग्णाची काळजी घेत आहे; मात्र त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाइकांचे प्रचंड हाल होत आहेत. लाॅकडाऊन असल्यामुळे खानावळ, रेस्टाॅरंट बंद आहेत. अशावेळी जेवणाचा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाचे डबे पुरविण्याचा उपक्रम सुरू केला. सामाजिक भान ठेवून जे जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे.
-प्रा. विजय बदखल
सामाजिक कार्यकर्ते, चंद्रपूर.