जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत सहा कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरसाठी प्रामुख्याने समाजकल्याण विभागाचे वसतिगृह आणि अन्य शासकीय इमारतींना प्राधान्य देण्यात आले. केंद्र सुरू होताच आरोग्य सुविधा निर्माण करण्यात आल्या. मात्र, या इमारती शासनाच्या विविध विभागाच्या मालकीच्या असल्याने कालांतराने अग्निसुरक्षेच्या ऑडिटचा प्रश्न पुढे आला. दरम्यान, याच कालावधीत सहा केंद्र असलेल्या इमारतींचा अग्निसुरक्षा ऑडिट प्रक्रिया पूर्ण झाली. बल्लारपूर येथील कोविड केअर सेंटर बंद होते. हे केंद्र आता भिवकुंड नाल्याजवळील वसतिगृहात सुरू झाले. या कोविड केअर केंद्राचे सुरक्षा ऑडिट झाले नसल्याची माहिती पुढे आली.
बॉक्स
चंद्रपुरातील वन अकादमीच्या कोविड केअर सेंटरमध्ये सर्वाधिक ४०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या २५० रुग्ण या केंद्रात उपचार घेत आहेत. ही इमारत अद्ययावत असून सुरक्षा ऑडिट प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रुग्णांना कुठलाही त्रास होऊ नये, आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने यंत्रणा बसविण्यात आली आहे. गंभीर रुग्णांना येथील शासकीय कोविड रुग्णालयात भरती केल्या जाते.
बॉक्स
चिमूर येथील कोविड केअर सेंटर समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात सुरू करण्यात आले. या केंद्रामध्ये १०० बेडची व्यवस्था आहे. सध्या ३४ रुग्ण उपचार घेत आहेत. ६६ बेड्स शिल्लक आहेत. ही इमारत समाजकल्याण विभागाच्या ताब्यात आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही सुरक्षा ऑडिट अद्याप झाले नाही. अशावेळी आगीच्या घटना घडल्यास प्रशासनाकडे पर्यायी उपाययोजना नसल्याचे दिसून आले.
बॉक्स
वरोरा येथील कोविड केअर सेंटर शासकीय वसतिगृहात सुरू झाले. वसतिगृहातचे बांधकाम सुरू असतानाच अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्यात आली. याशिवाय अग्निसुरक्षा यंत्रणेचे ऑडिट करण्यात आले. विद्युत व्यवस्थाही नियमानुसार आहे. मोकळ्या प्रशस्त जागेत इमारत असल्याने अडचणी नाहीत. सध्या या केंद्रात १७ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण वाढू लागल्याने उपाययोजनाही वाढविण्यात आल्या आहेत.