गोंडवाना विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेज निधीचा प्रश्न सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:45+5:302021-01-19T04:29:45+5:30
गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रशांत दोंतुलवार आणि संजय रामगीरवार यांनी चंद्रपूरला राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांचे आभार ...

गोंडवाना विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेज निधीचा प्रश्न सुटला
गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रशांत दोंतुलवार आणि संजय रामगीरवार यांनी चंद्रपूरला राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. तसेच विद्यापीठाच्या विविध कल्याणकारी योजनांवर त्यांच्याशी चर्चा केली.
उन्नत उच्च शिक्षणापासून दूर असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यावसायिक शिक्षण त्यांच्याच क्षेत्रात मिळावे, यासाठी गडचिरोलीला मॉडेल कॉलेज मिळाले. हे जिल्हे तेव्हा नागपूर विद्यापीठअंतर्गत होते. या मॉडेल कॉलेजसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने आठ लाख मंजूर केले. त्यापैकी आयोग व राज्य शासनाचा मिळून पहिला टप्पा तीन कोटी २७ लाख ३५ हजार रुपये नागपूर विद्यापीठाला प्राप्त झाले. पण, कॉलेजकरिता जागा उपलब्ध नसल्याने मॉडेल कॉलेज होऊ शकले नाही. तद्नंतर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हा मॉडेल कॉलेज गडचिरोली विद्यापीठात समाविष्ट होणे गरजेचे होते. मात्र, गोंडवाना विद्यापीठाला त्याकाळी १२ (ब) चा दर्जा नसल्याने कॉलेजचा विषय रखडला. आता गोंडवाना विद्यापीठाला तसा दर्जा मिळाला आहे. तसेच, या कॉलेजसाठी गडचिरोलीत सात एकर जागाही मंजूर झाली आहे. मॉडेल कॉलेजसाठी विद्यापीठाचे प्रभारी गुरुकुल डॉ. श्रीनिवास वरखेडी, तसेच सिनेट सदस्य प्रशांत दोंतुलवार, मनीष पांडे, संदीप पोशट्टीवार, संजय रामगीरवार, डॉ. परमानंद बावनकुळे इत्यादींनी माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना याबाबत विनंती केली. परिणामतः शासनाकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती सिनेट सदस्य येथील प्रशांत दोंतुलवार यांनी दिली.