उड्डाण पुलाचा प्रश्न ऐरणीवर

By Admin | Updated: November 2, 2015 01:00 IST2015-11-02T01:00:28+5:302015-11-02T01:00:28+5:30

दीर्घकळापासून प्रलंबित असलेल्या चंद्रपूर शहरातील बाबूपेठ उड्डाण पुलाला केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी मिळाली असली तरी

The question of flight bridge on the anagram | उड्डाण पुलाचा प्रश्न ऐरणीवर

उड्डाण पुलाचा प्रश्न ऐरणीवर

६९ कुुटुंबीयांचा विरोध : दीड लाख लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न
चंद्रपूर : दीर्घकळापासून प्रलंबित असलेल्या चंद्रपूर शहरातील बाबूपेठ उड्डाण पुलाला केंद्र आणि राज्य सरकारची मंजुरी मिळाली असली तरी या पुलामुळे बाधित होणार असलेल्या नझूलच्या जागेवरील ६९ कुटुंबीयांनी विरोध केला आहे. यामुळे जवळपास दीड लाख लोकांना वेठीस धरत उड्डाणपुलाचे काम लांबणीवर टाकण्यात आले आहे.
वरोरा नाका चौकात चुकीचे नियोजन करून पुलाचे बांधकाम करण्यात आल्यामुळे ५० हून अधिक लोकांचे बळी गेले. या चौकातील काही हितसंबंधीयांच्या मालकी हक्काच्या जमिनींना बाधा पोहोचू नये म्हणून राजकीय नेत्यांनी हे बळी घेतले. आता उड्डाण पुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्याचेसुद्धा डिझाईन चुकले. त्यामुळे नव्याने नकाशा तयार करून काम सुरू आहे. वरोरा नाका उड्डाण पुलाच्या चुकीच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर बाबूपेठ उड्डाण पुलाच्या कामात राजकीय अडसर निर्माण झाल्याची माहिती आता पुढे आली आहे. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये बाबूपेठ उड्डाण पुलाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी नागपुरात झालेल्या एका बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बाबूपेठ उड्डाण पुलाच्या नकाशाला मंजुरी दिली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने यातील त्रुटी अजूनही दुरूस्त केलेल्या नाही. रेल्वे उड्डाण पुलाचे काम रेल्वे प्रशासनाच्या देखरेखीखाली होणार असले तरी अप्रोचचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.
प्रस्तावित बाबूपेठ उड्डाण पुलामुळे नझूलच्या जागेवर असलेल्या ६९ घरांना बाधा पोहोचणार आहे. त्यामुळे या घरमालकांनी उड्डाण पुलाला प्रचंड विरोध दर्शविला आहे. बाधा पोहोचणार असलेल्या लोकांचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या राजकीय नेत्यांनीसुद्धा आता या लोकांची बाजू घेणे सुरू केले आहे. विकासकामे करताना लोकांची मने दुखवायची कशाला, अशी भूमिका घेत काही राजकीय नेत्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी बाबूपेठ उड्डाण पुलाचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. वास्तविक नझूलच्या जागेवरील अतिक्रमण निघाले तर या पुलाचा प्रश्नच मार्गी लागू शकतो.
मात्र केवळ ६९ कुटुंबांची विवंचना करणाऱ्या राजकीय नेत्यांना दीड लाख लोकांचा विसर पडला कसा, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे. बागला चौकातून बाबूपेठकडे रोज येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मार्गावर असलेल्या रेल्वेरूळावरून सुपरफास्ट ट्रेन धावत असतात. २४ तासातून १८ ते २० वेळा या मार्गावरचे फाटक बंद करावे लागते. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रत्येक वेळी ८ ते १० मिनिटे फाटक बंद असते. त्यामुळे गंभीर रुग्णांनासुद्धा फाटक सुरू होईपर्यंत ताटकळत राहावे लागते.
या मार्गावर उड्डाण पूल व्हावे, अशी जुनी मागणी आहे. ही मागणी आता मान्य झाली असताना पुलाचे बांधकाम लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. या वादावर अद्याप कोणताही मार्ग निघाला नसल्याने उड्डाण पुलाच्या टेंडर प्रोसेसचे काम थांबले आहे. त्यामुळे या उड्डाण पुलाचे काम नेमके केव्हा सुरू होईल, हे सध्यातरी सांगणे कठीण असल्याचे एकंदरीत चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The question of flight bridge on the anagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.