‘पीडब्ल्यूडी’चा बेजबाबदारपणा महिलेच्या जीवावर बेतला
By Admin | Updated: November 25, 2014 22:53 IST2014-11-25T22:53:22+5:302014-11-25T22:53:22+5:30
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणा नागरिकांच्या जीवावर चांगलाच बेतत आहे. बांधकाम विभागाने खोदलेली खोल नाली धोकादायक ठरत असून तोल जाऊन नालीत

‘पीडब्ल्यूडी’चा बेजबाबदारपणा महिलेच्या जीवावर बेतला
नागभीड : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणा नागरिकांच्या जीवावर चांगलाच बेतत आहे. बांधकाम विभागाने खोदलेली खोल नाली धोकादायक ठरत असून तोल जाऊन नालीत पडल्याने महिलेला जखमी व्हावे लागले.
चिमूरचे तत्कालीन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून नागभीड कृषी उत्पन्न बाजार समिती ते टी पार्इंट या एक किमीच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. ही नाली सलग न खोदता तुटक तुटक खोदण्यात आली आहे. त्यामुळे खोदलेल्या नालीत ठिकठिकाणी पाणी साचून आहे. येथील वर्दळीचे ठिकाण म्हणजे राम मंदिर चौक या ठिकाणीही अशाच प्रकारे नालीचे खोदकाम करुन ठेवले आहे. नालीचे खोदकाम करण्यात आल्यानंतर नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे नालीमध्ये अनेकांना तोल जाऊन पडल्याने जखमी व्हावे लागत आहे.
रविवारी रात्री उमरेड येथील वंदना लोखंडे (३५) नामक महिला तोल गेल्याने खोल नालीत पडली. मात्र, नागरिकांनी आपले जीव धोक्यात घालून महिलेला नालीतून बाहेर काढले. महिलेला बाहेर काढल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला आणि तेथे काम करणाऱ्या मजूर, ठेकेदाराला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. वास्तविक काम करणाऱ्या मजूर, ठेकेदाराचा यात कसलाही दोष नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जे काम सांगतील, तेच काम सुरु आहे. अधिकारी मात्र, कार्यालयातूनच कागदी घोडे नाचवित असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यापुढे अशी दुर्घटना घडू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नालीचे सलग खोदकाम करावे व संरक्षणाच्या दृष्टीने व्यवस्था करावी. (तालुका प्रतिनिधी)