प्रभाग रचनेचा प्रस्थापितांना धक्का

By Admin | Updated: December 25, 2016 01:04 IST2016-12-25T01:04:39+5:302016-12-25T01:04:39+5:30

चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक लवकरच होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी गुरुवारी

Push to the establishment of ward structure | प्रभाग रचनेचा प्रस्थापितांना धक्का

प्रभाग रचनेचा प्रस्थापितांना धक्का

नगरसेवकांमध्ये चिंता : एका प्रभागातील परिसर दुसऱ्या प्रभागात
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक लवकरच होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी गुरुवारी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. यंदा नव्याने प्रभागाची रचना करण्यात आली आहे. जुने ३३ प्रभाग मोडून आता १७ नव्या प्रभागाची रचना केली आहे. मात्र या नव्या प्रभाग रचनेमुळे अनेक प्रस्थापित नगरसेवकांना फटका बसला आहे. अनेकांचे अर्ध्याहून अधिक मतदार दुसऱ्याच प्रभागात गेल्याने नगरसेवकांमध्ये कमालीची चिंता पसरली आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या तीन लाख २० हजार ३७९ आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ६१ हजार १६४, अनुसूचित जमातीची लोकसंख्या २५ हजार ७९४ इतकी आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३३ प्रभाग पाडण्यात आले होते. या ३३ प्रभागातून ६६ नगरसेवक निवडून द्यायचे होते. याप्रमाणे मतदारांनी एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले.
या नगरसेवकांचे पाच वर्ष आता पूर्ण होत आहे. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक मार्च किंवा एप्रिल महिन्यात होऊ घातली आहे. मात्र यावेळी शासनाने पूर्वीच्या प्रभाग रचनेत बदल केला आहे. सध्या अस्तित्वात असलेले ३३ प्रभाग मोडीत काढून नव्याने १७ प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यात १७ प्रभागापैकी १५ प्रभागात प्रत्येकी चार नगरसेवक तर उर्वरित दोन प्रभागात तीन नगरसेवक, असे एकूण ६६ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. दरम्यान, जुन्या ३३ प्रभागाचे रुपांतर १७ प्रभागामध्ये केल्यामुळे नगरसेवकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे. यात अनेक नगरसेवकांच्या प्रभागातील बहुतांश भाग दुसऱ्या प्रभागात गेला आहे. सिव्हील लाईन हा प्रभाग आता जटपुरा प्रभागात विलीन झाला आहे. या सिव्हील लाईन प्रभागातील मित्रनगर परिसर वडगाव प्रभागात तर सिंधी कॉलनी परिसर नगिनाबागमध्ये गेला आहे. पूर्वी नगिनाबाग प्रभागात असलेला जगन्नाथबाबा नगर, रेव्हन्यू कॉलनी, जीवनज्योती कॉलनी हा परिसरही वडगाव प्रभागात विलीन झाला आहे.
यासोबतच पूर्वीच्या बाजार वॉर्ड प्रभागातील काही भाग महाकाली प्रभागात गेला आहे. विशेष म्हणजे, असा प्रकार जवळजवळ सर्वच प्रभागाबाबत घडला आहे. प्रस्थापित नगरसेवकांनी पाच वर्ष ज्या परिसरात कामे केली, नागरिकांशी जनसंपर्क वाढविला, नेमका तोच परिसर दुसऱ्या प्रभागात गेल्याने यंदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या विद्यमान नगरसेवकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांच्यासाठी ‘हमखास’ असलेले मतदारच त्यांच्या प्रभागात राहिले नाही, उलट नव्याने दुसराच परिसर त्यांच्या प्रभागात समाविष्ट झाला आहे. त्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांची चिंता वाढली आहे. (शहर प्रतिनिधी)

 

Web Title: Push to the establishment of ward structure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.