धान पट्ट्यात २ लाख ५३ हजार क्विंटल धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST2021-04-19T04:25:18+5:302021-04-19T04:25:18+5:30
नागभीड : आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून धानास योग्य भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल आदिवासी विकास महामंडळाकडे यावर्षी ...

धान पट्ट्यात २ लाख ५३ हजार क्विंटल धान खरेदी
नागभीड : आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून धानास योग्य भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल आदिवासी विकास महामंडळाकडे यावर्षी मोठ्या प्रमाणावर वाढला. यावर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या चिमूर प्रकल्पात २८ आदिवासी सोसाट्यांमार्फत धान खरेदी करण्यात आली. ३१ मार्चच्या आकडेवारीनुसार या २८ सोसायटयांनी धान उत्पादक तालुक्यातील तब्बल २ लाख ५३ हजार क्विंटल धानाची खरेदी केली आहे.
चिमूर आदिवासी प्रकल्पात नागभीड, चिमूर, सिंदेवाही, भद्रावती व वरोरा या तालुक्यांचा समावेश होतो. असे असले तरी या तालुक्यांपैकी नागभीड, सिंदेवाही व चिमूर या तालुक्यातच धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते.
नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात. शासनाने मागील वर्षीपासून आदिवासी सोसायटयांना व पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १८६८ अधिक बोनस व सानुग्रह असे असल्याने शेतकऱ्यांनी आपले धान सोसायटीमध्येच विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावरच धान विक्री केली. परिणामी धान खरेदीचे अधिकार असलेल्या सोसायट्यांसमोर खरेदी केलेले धान कुठे ठेवावे, हा प्रश्न काही काळ निर्माण झाला होता.
बॉक्स
पणन महासंघाकडूनही खरेदी
नागभीड तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदी तर करण्यात आलीच, पण त्याचबरोबर पणन महासंघाकडूनही मोठ्या प्रमाणावर धान खरेदी करण्यात आली. पणन महासंघाचे नागभीड व कोर्धा येथे धान खरेदी केंद्र आहेत. ही दोन्ही केंद्र धान खरेदीच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर धान खरेदी करण्यात आली. पण तपशिल प्राप्त होऊ शकला नाही
बॉक्स
धान खरेदी
तालुका क्विंटल
नागभीड १,१९,६२९.०९
सिंदेवाही ६७,०३७.५२
चिमूर ५२,३३४.६९
वरोरा ७,३१२.८३
भद्रावती ६,८२९.४२