राजुरात मंगल कार्यालये व दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:36 IST2021-02-27T04:36:54+5:302021-02-27T04:36:54+5:30

राजुरा : राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यातील स्थितीनुसार कोरोना ...

Punitive action against Mangal offices and shopkeepers in Rajura | राजुरात मंगल कार्यालये व दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

राजुरात मंगल कार्यालये व दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

राजुरा : राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही परिस्थिती पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यातील स्थितीनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या आहेत. या अनुषंगाने शुक्रवारी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नगर पालिका प्रशासन यांच्या संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत राजुरामध्ये शहरातील मंगल कार्यालय, दुकाने, हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

राजुरा तालुक्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, वाढत्या कोरोना विषाणू ( कोविड -१९) च्या प्रादुर्भावाला आळा घालण्याकरिता महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नगर पालिका प्रशासन यांच्या वतीने संयुक्तरीत्या राजुरा शहराच्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर, दुकानामधील विना मास्क व सामाजिक अंतर न पाळणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच लग्नसमारंभात घालून दिलेल्या अर्टीचे उल्लंघन करणाऱ्या तीन मंगल कार्यालये, सभागृह यांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण पंधरा हजार दंड आकारण्यात आला. मास्क न वापरणाऱ्या २९ व्यक्तींवर ११ हजार ८०० दंड आकारण्यात आला. तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या तीन दुकानांवर प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे सहा हजार रुपयांची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. यावेळी तहसीलदार हरीश गाडे, नगराध्यक्ष अरुण धोटे, पोलीस निरिक्षक चंद्रशेखर बहादुरे, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, अतिम बनसोडे, डॉ. विनोद डोणगावकर, मंडळ अधिकारी निरंजन गोरे, तलाठी दीपक गोहणे, सुनील रामटेके, मारोती अत्रे, विनोद खोब्रागडे, प्रकाश चेन्नुरवार, नगर पालिका प्रशासकीय अधिकारी रवी जांभुळकर आदी उपस्थित होते.

Web Title: Punitive action against Mangal offices and shopkeepers in Rajura