वैयक्तिक टीकेमुळे प्रचाराची पातळी घसरतेयं
By Admin | Updated: October 8, 2014 23:24 IST2014-10-08T23:24:46+5:302014-10-08T23:24:46+5:30
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असून १५ दिवसांपूर्वी गुण्यागोविंदाने राहत असलेले सर्वच पक्ष सत्तेच्या हव्यासापोटी एकमेकांची उणी-दुणी काढत आहेत. एकमेकांवर चिखल फेकण्याचे

वैयक्तिक टीकेमुळे प्रचाराची पातळी घसरतेयं
ब्रह्मपुरी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असून १५ दिवसांपूर्वी गुण्यागोविंदाने राहत असलेले सर्वच पक्ष सत्तेच्या हव्यासापोटी एकमेकांची उणी-दुणी काढत आहेत. एकमेकांवर चिखल फेकण्याचे लोन सर्वच ठिकाणी दिसत असून साम, दाम, दंड आता प्रचारात सुरू झाला आहे.
वैयक्तिक टिकाटिपणीमुळे कोणताही पक्ष भविष्यातील मतदारसंघाच्या ‘व्हिजन’बद्दल बोलताना दिसत नाही. नेत्यांच्या वैयक्तिक टीकेमुळे कधी नव्हे ती प्रचाराची पातळी घसरलेली आहे. परिणामी भविष्यातील विधानसभा क्षेत्रातील सुजाण नागरिकात धास्ती निर्माण झाली आहे. नेत्यांच्या वैयक्तिक दोषांमुळे राजकीय पक्षांचे उमेदवार, ‘कोठे घेऊन जाणार मतदारसंघ माझा’, अशीच स्थिती सर्वसामान्य मतदारात निर्माण झाली आहे.
विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर युती व आघाडी एकत्ररीत्या निवडणुकीला समोर जाणार असा सर्वच राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पदाच्या लालसेने युती व आघाडी संपुष्टात आणून, सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून गळ्यात गळे घालणारे नेते परस्पराविरोधी उभे ठाकले आहेत. काहीही करुन आमदारकी हस्तगत करायची, या महत्त्वाकांक्षेने पछाडलेले सर्वच राजकीय पक्षांचे राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांपासून ते गल्लीगोबाळ्यातील नेतेही वैयक्तिक पातळीवर टीकाटिप्पणी करीत आहेत. बोलण्याची ढब, पेहराव, केशरचना याबाबत कुत्सीतपणे टर उडवली जात आहे. त्यांच्या टिपणींमुळे कार्यकर्त्याचे मनोरंजन होत असले तरी विकासाचे कोणतेच व्हीजन दिसत नाही.
विधानसभा क्षेत्रातील मूळ समस्यांवर व मतदारांच्या हिताच्या बाबतीत समस्येला बगल दिली जात आहे.
ब्रह्मपुरी-सावली, सिंदेवाही तालुक्यात विविध प्रश्न मार्गी लागल्यास येथील शेतकरी वर्ग सुजलाम सुफलाम होऊ शकतो. तालुक्यातील महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे गोसीखुर्द कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. परंतु गोसीखुर्दच्या कामासाठी आतापर्यंत जो निधी मिळाला तो मी आणला आहे, असे बोलले जात आहे. पण त्यानंतरच्या पूर्णत्वास कामास लागणारी निधी कोण आणणार, हे मात्र उमेदवारांकडून सांगितले जात नाही. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम उमेदवारांकडून केले जात आहे. सर्वसामान्य मतदार गर्दीमध्ये हे सारे मूग गिळून ऐकूण घेताना दिसत आहे. हे विशेष.(प्रतिनिधी)