पुस्तिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
By Admin | Updated: November 21, 2015 00:49 IST2015-11-21T00:48:51+5:302015-11-21T00:49:39+5:30
महाराष्ट्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विकासछाया व घडी पुस्तिकेचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ....

पुस्तिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
वर्षपूर्ती घडीपुस्तिका प्रकाशित : विविध योजनांचा घेतला आढावा
चंद्रपूर : महाराष्ट्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विकासछाया व घडी पुस्तिकेचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते २० रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रकाशन करण्यात आले.
विकास कामावर आधारीत छायाचित्र असलेली विकासछाया पुस्तिका व एक वर्ष प्रगतीचे विश्वासाचेङ्घया घडी पुस्तिकेच्या प्रकाशनाला वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार शोभाताई फडणवीस, विजय वडेट्टीवार, प्रा. अनिल सोले, नाना शामकुळे, अॅड. संजय धोटे, सुरेश धानोरकर, कीर्तीकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर उपस्थित होते.
गेल्या वर्ष भरात सरकारने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. या निर्णयाची थोडक्यात माहिती या घडी पुस्तिकेत देण्यात आली आहे. तर विकासछाया पुस्तिकेत विकास कामाची छायाचित्र समाविष्ट आहेत. जलयुक्त शिवार, वन विभाग, महाराजस्व अभियान, आदिवासी विभाग, समाज कल्याण विभाग व पीक कर्ज या विषयीची माहिती या पुस्तिकेत दिली आहे. वनमंत्री म्हणून ना. मुनगंटीवार यांनी गेल्या एका वर्षात लोकहिताचे ४२ निर्णय घेतले आहेत. तर जलयुक्त शिवारमध्ये जिल्ह्यात अतिशय चांगले काम झाले आहे. महाराजस्व अभियानात अनेक लोकांना विविध दाखले वाटप करण्यात आले.
सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या एक वर्षात सरकारने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. चंद्रपूर जिल्ह्याचाच विचार करायचा झाल्यास जिल्हा आज विकासाच्या नव्या वळणावर आहे. चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्र, वनस्पती उद्यान, सैनिकी शाळा, चांदा ते बांदा विकास करण्यासाठी समितीचे गठण, ताडोबाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणे, महानायक अमिताभ बच्चन यांना व्याघ्रदूत नेमणे, जिल्ह्याच्या विकासात लोकांचा सहभाग घेण्यासाठी ठिकठिकाणी विकास परिषद घेणे, बांबू परिषद, बाबुपेठ उड्डाण पुलासाठी निधी, मॉडेल पोलीस स्टेशन बल्लारपूर, मूल बल्लारपूर शहरात सीसीटीव्ही बसविणे, बस स्थानकाचे आधुनिकीकरण, चंद्रपूर शहर विकासाठी निधी उपलब्ध करून देणे, गोसेखुर्दचे पाणी जिल्हयात आणणे, डिसेंबर मध्ये होणारा ताडोबा पर्यटन महोत्सव, बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाचानालय, स्वातंत्र्य सैनिकांसाठी आरोग्य शिबिर, भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम उद्यान, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई रकमेत वाढ, माजी मालगुजारी तलावाच्या दुरुस्तसाठी निधीत भरपूर वाढ, उद्योगाला चालना देण्यासाठी मेक इन चंद्रपूर असे असंख्य निर्णय एका वर्षाच्या कार्यकाळात घेतले आहेत.
वनविभागाला कधी नव्हे ते विकास झोतात आणण्याचे काम या वर्षभरात झाले आहे.
वनातील वन उपजापासून महसुल प्राप्त करून देणारी वनधन जनधन ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यात प्रथमच आखण्यात आली. वनात ३३ प्रकारची वन उपज निर्माण होतात याचा उपयोग वन महसूल वाढविण्यासाठी होऊ शकतो ही बाब ओळखून नागपूर येथे राज्यातील पहिले वनधन जनधन विक्री केंद्र सुरु केले. अशाच प्रकारच्या विक्री केंद्राची साखळी आता राज्यभर निर्माण केली जाणार आहे.
बफर क्षेत्रातील वनालगतच्या गावांचा विकास साधणारी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना तर गावांचा कायापालट करणारी योजना आहे. या निर्णयाचा या पुस्तिकेत उल्लेख करण्यात आला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)