चंद्रपुरात ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’बाबत जनजागृती
By Admin | Updated: March 25, 2017 00:51 IST2017-03-25T00:51:27+5:302017-03-25T00:51:27+5:30
जागतिक जल दिनानिमित्त इको-प्रो संस्थेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ बाबत नागरिकांमध्ये पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.

चंद्रपुरात ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’बाबत जनजागृती
पत्रकांचे वाटप : ‘ईको-प्रो’चा जागतिक जलदिन उपक्रम
चंद्रपूर: जागतिक जल दिनानिमित्त इको-प्रो संस्थेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ बाबत नागरिकांमध्ये पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली.
२२ मार्च ‘जागतिक जल दिन’ म्हणून साजरा केला जातो. पाण्याची गरज नाही, असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, काही दशकांपूर्वी पाण्याचा अविचारी, अयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे जाणवले. पृथ्वीवरील पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, जलस्त्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. चंद्रपूर सर्वाधिक प्रदूषित शहर असताना तेथे भविष्यात पिण्याच्या पाण्याची समस्यासुध्दा उग्र रूप धारण करू शकते. गेल्या काही वर्षां चंद्रपुरात पाणी समस्या मोठया प्रमाणावर वाढत आहे. शहरी भागात तसेच औद्योगिक वापरासाठी मोठया प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो. म्हणून आता ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ म्हणण्यापेक्षा पावसाचे पाण्याचे जलपुर्नभरण करणे अगत्याचे झाले आहे.
चंद्रपूर शहरातील पाण्याची पातळी जवळपास १००-१५० फुटांपर्यत खोल गेलेली आहे. काही भागात त्यापेक्षा अधिक खोलवर खोदूनही पाणी लागत नाही. पंरतु, त्या प्रमाणात बोअरवेल किंवा विहीरीत पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण केले जात नाही. याकरिता जागतिक जल दिनाचे औचित्य साधून ईको-प्रो संस्थेच्या सदस्यांनी शहरात ठिकठिकाणी रेन वॉटर हॉर्वेस्टिंगबाबत पत्रके वाटून नागरिकांमध्ये जनजागृती केली.
या शहरातील इमारंतीना, शासकीय व निमशासकीय इमांरतीना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग करावे, या मागण्यांचे निवेदन संस्थेतर्फे महानगरपालिकेला देण्यात आले. या जनजागृती अभियानात संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, ईको-प्रो पर्यावरण विभागप्रमुख नितीन रामटेके, बंडू दुधे, राजू काहीलकर, मनीष गांवडे, महेश होकर्णे, वैभव मडावी, सागर कावळे, आशिष मस्के, बिमल शहा आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)